मुंबई- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या हल्ल्याबाबत पोलीस, सैफच्या घरातील कर्मचारी, सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूर आणि त्याच्यावर ज्या लीलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली तेथील डॉक्टर या सर्वांनी दिलेली माहिती बुचकळ्यात टाकणारी आहे. शिंदे गटाचे संजय निरूपम यांनी या हल्ल्याबद्दल संशय व्क्त केल्यानंतर आता भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी थेट सवाल केला की हा हल्ला होता की सैफने नाटक केले ? या सवालामुळे गृहमंत्री फडणवीस यांचीच अडचण वाढणार आहे .
बंदरे आणि मत्स्यपालन खात्यांचे मंत्री नितेश राणे काल आळंदी येथे आयोजित हिंदु मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या उच्छादावर बोलताना त्यांनी सैफवरील हल्ल्यावर सडेतोड भाष्य केले. ते म्हणाले की सैफवर झालेला हल्ला मला संशयास्पद वाटतो. त्याच्यावर खरोखरच हल्ला झाला की त्याने हल्ला झाल्याचे नाटक केले? त्याने स्वतःच स्वतःच्या पाठीत चाकू खुपसला का हेच कळत नाही. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या. त्यापैकी दोन गंभीर जखमा आहेत, असे लीलावतीचे डॉक्टरांनी सांगितले. एक जखम तर पाठीच्या मणक्यापर्यंत खोलवर होती. त्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली म्हणतात. मग एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली असताना पाच दिवसांत सैफ टुणटुण उड्या मारत घरी कसा काय जाऊ शकतो?
आज या वक्तव्याबाबत सवाल केला असता राणे म्हणाले की जनतेत हीच चर्चा आहे. यावर सैफ कुटुंबाने खुलासा करायला हवा. संशयाचे निरसन केले पाहिजे सैफवरील हल्ल्याबाबत रोज नवनवीन सवाल उठत आहेत. सहाव्या मजल्यावरील सीसीटीव्हीमध्ये एक तरुण दिसला होता तो आरोपी नसेल तर तो कोण होता? सैफच्या इमारतीत सामान्य सुरक्षा कशी नव्हती? पोलीस म्हणाले की आरोपी बंगाली भाषेत वेगाने बोलत असल्याने त्याचे बोलणे कळत नाही, असे असताना पोलिसांनी त्याचा जबाब कसा नोंदवला? रुग्णालयात जाताना रक्तबंबाळ झालेल्या सैफने आपल्या आठ वर्षांच्या छोट्या मुलाला सोबत का नेले? या सर्व प्रश्नांचा खुलासा होणे गरजेचे आहे.
आज राणेंच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता ते म्हणाले की, सैफवरील हल्ला प्रकरणात सगळी माहिती पोलिसांनी घेतली आहे. तरीही कोणाला काही शंका असतील तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी आणि पोलिसांना विचारावे.
सीसीटीव्हीत दिसणारा माझा मुलगा नाही!
सीसीटीव्हीत दिसणारा माझा मुलगा नाही. असा दावा शरीफुलचे वडील रुहुल अमीन फकीर यांनी केला. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद पोलिसांच्या अटकेत आहे. याठिकाणी त्याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, शरीफुलचे वडील रुहुल फकीर यांनी शरीफुल संदर्भातील अनेक दावे फेटाळले आहेत.
शरीफुलचे वडील म्हणाले की, आम्ही सारे राजकारणाशी जोडलेलो आहोत. आम्ही बांगलादेशात बीएनपी पार्टीचा भाग होतो. मी, पत्नी आणि माझी आणखी तीन मुले आमच्यावर खूप अत्याचार झाले आहेत. 2024 मध्ये जानेवारी महिन्यात शेख हसीना शक्तीशाली झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावात राहणे कठीण झाले होते. तेव्हा शरीफुल मला म्हणाला, अब्बा आता आपण काय करायचं? त्यानंतर मार्च2024 मध्ये शरीफुल अवैध मार्गानं भारतात गेला. त्याच्यासोबत कोणतीच कागदपत्र नव्हती. तो बांगलादेशमध्ये बाईक चालवण्याचे काम करत होता. मीच त्याला बाईक खरेदी करून दिली होती. याठिकाणी बाईक चालवण्याचे लायसन्सही देतात. तो कधीच कुस्ती खेळलेला नाही, त्याला कुस्ती खेळायला कधीच आवडायचे नाही.
मला हिंदी बोलता येत नाही, थोडीफार समजते. मी बांगलादेशातील खालिदपूर जिल्ह्यातील फुलना येथील एका फूलना पीपल्स जूट मिलमध्ये लिपिक म्हणून काम करतो.
शरीफुल सोबत गेल्या आठवड्यात शुक्रवारी 10 जानेवारीला बोलणे झाले होते. त्याला दर महिन्याच्या दहा आणि पंधरा तारखे दरम्यान पगार मिळायचा. तो दहा ते पंधरा हजार रुपये आम्हाला पाठवायचा. तो मुंबईत एका हॉटेलात काम करायचा असे त्याने सांगितले होते,त्याच हॉटेल मालकाने शरीफुलला अटक केल्याचा व्हिडीओ आम्हाला पाठवला होता. त्याने कोणावर हल्ला केला, या घटनेबाबत काहीच माहीत नाही, सर्व घडामोडी टीव्ही चॅनलवर पाहिल्या.