मुंबई- सिनेअभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला केल्यानंतर तीन दिवस 35 पोलीस टीमना सतत चकवा देणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात यश मिळाल्याचा दावा आज मुंबई पोलिसांनी केला. पोलीस डीसीपीनी पत्रकार परिषदही घेतली. पण या आरोपीचा हल्ल्याशी काहीही संबंध नाही असे त्याच्या वकिलाने सांगितले. त्यामुळे हल्लेखोर कोण हा गोंधळ आजही सुरूच राहिला. त्यात पोलिसांनी आरोपी हा बांगलादेशी असल्याचे सांगण्याची प्रचंड घाई केली. त्याची सर्व कागदपत्रे न तपासता अंदाज म्हणून हा दावा केला. बांगलादेशी हा शब्द ऐकताच त्यांच्याविरूध्द आघाडी घेतलेले किरीट सोमय्या हे तडक आरोपीला अटक केली तिथे पोहोचले आणि तिथे राहणारे आणखी 4/5 कामगार बांगलादेशी आहेत हे कळल्यावर तर सोमय्या प्रचंड आक्रमक झाले. आपण ज्या नेत्याच्या विरोधात पुरावे देतो त्याला आपल्याच पक्षात घेऊन क्लीनचिट दिले जाते हे लक्षात आल्यावर आता सोमय्या गरीब बांगलादेशींच्या मागे लागले आहेत.
मोहंमद शरीफुल इस्लाम शहजाद असे नाव असलेल्या या हल्लेखोराला पोलिसांनी ठाण्यातील कासारवडवली येथे ताब्यात घेतले. त्याला पकडताच पोलिसांनी सर्वात आधी तो बांगलादेशी असल्याचे सांगितले. त्याची ही पहिलीच चोरी असल्याचे सांगितले जात आहे. पण पहिल्याच चोरीसाठी तो थेट सैफच्या घरात गेला हे पटत नाही. त्याने सैफच्या घरात प्रवेश कसा केला, तो एकटा होता की त्याच्यासोबत आणखी कोणी होते, तो चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात गेला असे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले, पण त्याने घरातील दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरल्या नाहीत असा जबाब करिनाने दिला आहे. त्यामुळे पोलीस काहीतरी लपवाछपवी करीत असल्याचा संशय अजूनही येतो आहे.
सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या बाबतीत पोलीस गेले तीन दिवस अंधारात चाचपडत होते. या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची 35 पथके तयार करण्यात आली होती. हल्लेखोराची काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आली होती. त्याआधारे 50 संशयितांची चौकशी करण्यात आली. परंतु ते हल्लेखोर नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मुंबईपासून छत्तीसगडपर्यंत शोध सुरू असूनही हल्लेखोर हाती लागत नसल्याने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच काल रात्री मुंबई पोलिसांनी ठाण्यात जाऊन कारवाई केली. या कारवाईत हाऊसकीपिंग एजन्सीत काम करणार्या 30 वर्षीय मोहंमद शरीफुल इस्लाम शहजाद याला ठाण्यात लेबर कॅम्पजवळील जंगलातून मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलिसांच्या 200 जणांच्या संयुक्त पथकाने अटक केली. त्याला तेथून चेंबूर आणि मग खार पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस सतत हल्लेखोराच्या मोबाईलचे लोकेशन तपासत होते. हल्लेखार हल्ल्याच्या दिवशी दादरला गेला होता. तिथे त्याने इअरफोन विकत घेतले, त्यावेळचे त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यानंतर त्याने वरळीला जाऊन एका नवीन एक्का या हॉटेलात नाश्ता केला. त्याने जीपेने पेमेंट केले. त्याच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग घ्यायला सुरुवात केली. काल रात्री ठाण्यातील लेबर कॅम्प भागात त्याचे लोकेशन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी या लेबर कॅम्पमधील कामगारांची कसून चौकशी केली. त्यातून त्यांना मोहंमद इथे राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात त्याचा शोध सुरू केला. पोलीस शोधत असल्याचे कळताच मोहंमद लेबर कॅम्पजवळील जंगलात लपला. त्यामुळे पोलिसांनी तिथे कोंबिंग ऑपरेशन केले. आरोपीने लपण्यासाठी अंगावर झाडाची पाने आणि गवत पांघरले होते. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने पोलिसांना सुरुवातीला आपले नाव विजय दास असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने अनेकदा नाव बदलले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला. ही सर्व माहिती पोलिसांनी अधिकृत दिली नसून ही ऐकीव माहिती आहे.
हल्लेखोराला अटक केल्यानंतर आज सकाळी पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, 16 जानेवारी रोजी सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने एक आरोपी गेला होता. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव आहे . या आरोपीला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडे कोणतीही वैध भारतीय कागदपत्रे सापडली नाहीत. आरोपीकडे जी इतर कागदपत्रे सापडली त्यावरून तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे .तो भारतात आल्यानंतर त्याने स्वत:चे मोहंमद शरीफुल इस्लाम शहजाद हे नाव बदलून विजय दास असे नाव ठेवले होते. आरोपी 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता आणि एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत त्याची आणखी माहिती मिळालेली नाही. हल्लेखोराने वापरलेले हत्यारही मिळालेले आहे. हल्लेखोराची चौकशी सुरू आहे. पुढची माहिती लवकरच देण्यात येईल.
सैफच्या हल्लेखोरोबाबत अनेक प्रश्न विचारल्यावर पोलिसांनी आरोपीला काही तासांपूर्वी पकडल्यामुळे त्याची अजून चौकशी झाली नाही असे सांगितले. मात्र कुठलीही चौकशी न करताच पोलिसांनी मोहंमद हा बांगलादेशी असल्याचे सांगितले. त्याला पकडल्यानंतर त्याला चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या टीमने त्याची चौकशी केली. चेंबूरहून त्याला पहाटे 4 वाजता खार पोलीस ठाण्यात आणले. त्याची भाभा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे मोहम्मद शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्य़ात आली. मुंबई पोलिसांनी न्यायालयात 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
आरोपी मोहम्मद शहजादचे वकील संदीप शेरखाने म्हणाले की, पोलिसांनी मोहंमदला केलेली अटक चुकीची असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे स्पष्ट उल्लंघन केले. त्याला नोटीस देण्यात आली नव्हती, तो सराईत गुन्हेगार नाही. त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही असे आमचे म्हणणे आहे. न्यायालयाने पोलिसांना पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने मोहंमदला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आम्ही पोलीस कोठडीला विरोध केला होता. कारण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आधीच केला आहे. शस्त्रही पकडले आहे. आरोपींवर लावलेले हत्येच्या प्रयत्नाचे भारतीय न्याय सहितेचे कलम 109 हेही चुकीचे आहे. आरोपीने मी तुझा खून करतो, असे सैफला धमकावलेले नाही. त्यामुळे त्याचा हत्येचा अजिबात हेतू नव्हता. आरोपी बांगलादेशी आहे हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत जी योग्यवेळी आम्ही दाखवू .हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कट नाही. मोहंमद 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता, हे खोटे आहे. तो आणि त्याचे कुटुंब सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मुंबईत राहत आहे.या संपूर्ण प्रकरणात कोणताही आंतरराष्ट्रीय मुद्दा दिसत नाही.
मात्र, मोहंमद शहजाद हा आधी बांगलादेशमध्ये राहत होता. आता तो मुंबईत राहत आहे, असेही वक्तव्य नंतर त्याच्या वकिलांनी केल्याने हल्लेखोर नेमका कुठला आहे, याबाबत संभ्रम आहे. तो हाऊस किपिंग एजन्सीकडून सैफच्या घरी सफाई कर्मचारी म्हणून गेला होता. तो अंधेरी येथेही काही काळ वास्तव्याला होता, असेही म्हटले जात आहे. त्याला हाउस कीपिंगचे काम देणारा मुकादम पांडे याला पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. तर तो शेवटी ठाण्यातील ज्या हॉटेलात कामाला होता, तिथल्या व्यवस्थापकांची आणि कर्मचार्यांची चौकशी पोलिसांनी केली आहे. दरम्यान, भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात उडी घेत म्हटले की, सैफ अली खानवर हल्ला कारणारा मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद हा घुसखोर बांगलादेशी आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.