महाड- तालुक्यातील सावित्री नदी व अरबी समुद्राच्या संगमावर बाणकोट, बांगमाडला, वेळास या तीन गावांच्या हद्दीत समुद्रात तीन किलोमीटरहून अधिक अंतराचा सँड बार म्हणजेच वाळूचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ जलमार्गाला अडथळा निर्माण झाला आहे.
समुद्र व खाडी यांच्या संगमावर किनारा नसल्याने समुद्राच्या लाटांनी वाहून आलेली पुळण अथवा बारीक वाळूचा थर खाडी मुखाजवळ साचतो. त्यानंतर अनेक वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे येथे वाळूचा पट्टा तयार होतो. या सँडबारमुळे खाडीतून समुद्रात होणार्या जलवाहतुकीस अडथळा येतो. विशेषतः ओहोटीच्या वेळी ही वाहतूक अतिशय खडतर होते.अनेक वेळा मच्छिमार बोटी या वाळूत रुतून अपघातही होतात.सावित्री नदी (बाणकोट खाडी ) व अरबी समुद्राच्या या भागातून सर्व प्रकारचे नौकानयन अडचणीत आलेल्या असताना दुसरीकडे सावित्री नदीच्या बॅकवॉटरमध्येही मासे येणे बंद झाल्याने या गावांतील मच्छीमार मोठ्या अडचणीत सापडले आहेत.या भागात कोळंबी वगळता अन्य प्रकारचे मासे मिळणे दुरापास्त झाले आहे.नदी किनार्यावरील सर्व मच्छीमार बांधव अडचणीत आल्याने उदर निर्वाहासाठी जबरदस्तीने अन्यत्र स्थलांतर करू लागले आहेत.