बीड- संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, फरार आरोपीला लवकरात लवकर पकडा, सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा, या मागण्या करत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. मनोज जरांगे-पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या विनंतीनंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र सरकारला उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण गावाने आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे मस्साजोगमधील वातावरण तापले आहे.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 35 दिवस उलटूनही अद्याप एक आरोपी फरार आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रमुख वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही. तसेच पोलीस तपासाची माहिती का देत नाहीत, असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. काल त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे आज मस्साजोगमधील तीनही मोबाईल टॉवरभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, आज सकाळी धनंजय देशमुख अचानक गायब झाले. ते कुठे आहेत, हे कुणालाच ठाऊक नव्हते. त्यांचा मोबाईलही बंद होता. गावकऱ्यांनी धनंजय देशमुख यांचा शोध सुरू केला. पण ते सापडत नव्हते. ते कुठे गेले हे कुटुंबालाही माहिती नव्हते. त्यामुळे गावकरी अस्वस्थ झाले होते. धनंजय देशमुख यांना पोलिसांनीच गायब केले, अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, काही वेळाने धनंजय देशमुख पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकीजवळ पोहोचले. या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन सुरू केले. धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देखील पाण्याच्या टाकीवर चढली होती. त्यानंतर तीन तास मस्साजोगमध्ये हे आंदोलन सुरू होते.
धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थही पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. त्यांनी टाकीभोवती गरांडा घातला. त्यानंतर तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तिथे पोहोचले. त्यांनी धनंजय देशमुख यांना मोबाईलवर तीन-चार वेळा फोन करून खाली उतरण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही तिथे पोहोचले. त्यांनीही धनंजय देशमुख यांना फोन करून खाली उतरायला सांगितले. मात्र धनंजय देशमुख खाली उतरण्यास तयार नव्हते. काही वेळाने या दोघांच्या विनवणीनुसार तब्बल तीन तासांनी ते पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना मिठी मारत हंबरडाच फोडला.
आंदोलन मागे घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आम्हाला या तपासासंदर्भात पोलिसांकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही मोकाटच आहे. त्याला तत्काळ अटक करावी. वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सहआरोपी करून मोक्का लावावा.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस साहेब तुम्हाला शेवटची विनंती आहे. खंडणीखोर आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत. या सर्व आरोपींना मोक्का आणि 302 कलम लावावे. तसेच देशमुख कुटुंबाला धक्का लागला आणि तपास यंत्रणेचा गैरवापर होत असेल तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचा आम्ही सामना करू. आमचा संयम सुटला तर अवघड होईल.
दरम्यान, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी मिळाल्यानंतर अस्वस्थ होते. त्यांना वारंवार फोन येत होते, असा जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे नोंदवला असल्याची माहिती आहे.
शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदामुळे तपासात अडथळे येत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. सह्याद्री अतिथीगृहावर नोटा मोजतानाचे फोटो समोर आलेत. वाल्मिक कराड व धनंजय मुंडे डिलिंग करण्यासाठी सह्याद्रीसारख्या ठिकाणी बसतात. यावरून तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येईल. वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय स्थानिक जनता व आम्ही लोकप्रतिनिधी स्वस्थ बसणार नाहीत. तर सरपंच देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला. तरी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. मुख्य आरोपी सोडून सर्व आरोपींना मोक्का लावला. आरोपीवर विविध भागातून तक्रार दाखल करायला जातात. पण पोलीस तक्रार घेत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. वाल्मिक कराड बाहेर आला, तर आमच्या जिवाला धोका उदभवेल, अशी भीती लोकांना वाटत आहे. या प्रकरणात पोलीस कुणाला वाचवत आहेत, असा सवाल शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी विचारला. दरम्यान, आरोपी विष्णू चाटेला बीड सत्र न्यायालयाने आज 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.