शिर्डी- शिर्डीत आज झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दांडी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित नव्हते . त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या महिलांनी राख्या बांधल्या. राज्यात लाडकी बहीण योजनेला राज्यातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी य सांगितले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, विकसित भारतासाठी महिलांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमच्या सरकारने अनेक कार्यक्रम सुरु केले आहेत. अनेक योजनांना वेळ लागणार असला तरी त्यातून यश निश्चित मिळेल. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्याकडे आता कोणतेही मुद्दे नाहीत. ते खालच्या पातळीवर उतरले म्हणून मी काही उतरु शकत नाही. विधानसभा निवडणूकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्याच्या दौऱ्यावर असून ते सर्वच भागात जाऊन कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत आहेत. ते मुंबई व कोकणातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत .
शासनाने या कार्यक्रमासाठी मोठी तयारी केली होती. नेहमीप्रमाणे भव्य मंडपात खास राखी बांधून घेण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला होता. त्यावरुन फडणवीसांनी महिलांनी बांधलेल्या राख्यांचा स्विकार केला.