मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या मुंबईतील सर्व 36 विभाग अध्यक्षांची बैठक घेत पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. विधानसभेला एकनाथ शिंदेंनी महायुतीत येऊ दिले नाही. त्यामुळे आता भाजपाशी थेट युती करून पालिका निवडणुका लढवूया, असा आरोप करत मनसे पदाधिकार्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाशी युती करण्याचा आग्रह राज ठाकरे यांच्याकडे धरला.
एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मनसेला विधानसभा निवडणुकीत फटका बसला. त्यांनी मनसे विरोधात उमेदवार उभे केले. ठाकरे गट आणि मनसेही एकत्र येऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर कापले गेले आहेत. कारण मतभेद खूप आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करावी, असे मत पदाधिकार्यांनी या बैठकीत मांडले. त्यावर राज ठाकरे यांनी भाजपा-मनसे युतीबाबत विचार करू. पण विधानसभेत जे झाले, ते विसरा, आता पालिका निवडणुकांसाठी तयारीला लागा, असा आदेश मनसे विभाग अध्यक्षांना दिला. महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेच्या मधल्या फळीतील नेत्यांची एक टीम तयार केली जाणार आहे. ती राजकीय स्थितीचा आढावा घेईल. आगामी निवडणुकीत मनसेची राजकीय वाटचाल, इतर पक्षांसोबत युती याबाबत अंतिम निर्णय घेताना या टीमची मते जाणून घेतली जातील, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीनंतर संदीप देशपांडे म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे यासाठी आज मुंबईच्या सर्व विभाग अध्यक्षांची ही बैठक बोलावली होती. येत्या काही दिवसांत पक्षात फेरबदल करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. तो बदल काय असेल हे नंतर समजेल. विधानसभेत भाजपाशी युती का झाली नाही, त्यावेळी काय चर्चा झाली, कशामुळे नुकसान झाले याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाशी युती करायची याचीही चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील.
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपात युती होणार असे सांगितले जात होते. राज ठाकरे यांनी तसे संकेत दिले होते. यासंदर्भात भाजपा नेते आणि राज ठाकरे यांच्यात बैठकाही झाल्या होत्या. मनसे सत्तेत असेल आणि मनसेच्या साथीने भाजपाचा मुख्यमंत्री होईल असे सूचक वक्तव्यही राज ठाकरेंनी केले होते. भाजपाचे नेतेही माहीम मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा विजय व्हावा, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, शेवटच्या क्षणी ही युती फिस्कटली. मनसेने सव्वाशेहून अधिक मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. लोकसभा निवडणुकीत मनसेने शिवसेना शिंदे गटाचा प्रचार केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्याची परतफेड केली नाही. उलट विधानसभा निवडणुकीत माहीम, वरळी मतदारसंघात दोन्ही पक्षांत संघर्ष झाला. त्यात अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का बसला. अमित ठाकरेंच्या पराभवाला शिवसेनेचे सदा सरवणकर कारणीभूत ठरले. वरळीत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे विजयी होऊन संदीप देशपांडे पराभूत झाले. या पराभवाला शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले मिलिंद देवरा कारणीभूत ठरले, अशी मनसैनिकांची भावना असल्याने त्यांच्या मनात शिवसैनिकांबद्दल संताप आहे.