मुंबई – केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली होती. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली होती. फडणवीसांनी काल याबाबत कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने काल रात्री उशिरा मुदतवाढीबाबत पणन महासंघाला पत्राद्वारे कळवले. देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले.
अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री झालेली नाही. मुदतवाढ दिल्यामुळे हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत