सोलापूर – राज्य सरकारने शालेय पोषण आहारासाठी नवीन पाककृती तयार केली आहे.त्यामध्ये अंड्यानंतर आता विद्यार्थ्यांना खिरीपासूनही वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शालेय पोषण आहाराच्या पाककृती वारंवार बदलण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना आता कोणता पोषण आहार मिळणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील चार लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.यामध्ये खिचडी, केळी,अंडी, खीरीचाही समावेश होता. मात्र,आता पोषण आहारातून खिरीला वगळले आहे.खीर बंद झाल्याने विद्यार्थ्यांना कोणता गोड पदार्थ मिळणार हे येत्या काही दिवसात कळणार आहे.शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. त्यामध्ये पोषण आहारात खीर बनविताना अनेक अडचणी येत असल्यामुळे आहारातून खीर वगळण्यात यावी,अशी मागणी राज्यातील विविध शिक्षक संघटना,शिक्षकांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे पोषण आहारातून खीर वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.