अहिल्यानगर -शनिशिंगणापूरमध्ये येत्या १ मार्चपासून शनिदेवाला केवळ शुद्ध आणि ब्रँडेड तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शिंगणापुरातील चौथऱ्यावर शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, तेलात अनेकदा भेसळ केलेली असते. त्यामुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत आहे. ही झीज रोखण्यासाठी शनीशिंगणापूरच्या देवस्थानने हा निर्णय घेतला आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकलयुक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल आणि मिश्रित तेल वाहून अभिषेक करतात. अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर(शिळेवर) परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार एक मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. भाविकांनी अभिषेकासाठी आणलेल्या तेलाविषयी शंका आल्यास ते तेल स्वीकारले जाणार नाही.