मुंबई – पर्यायी महामार्गाचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न महायुती सरकार करीत असल्याची टीका करून याविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी बाधित शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक येत्या गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे होणार आहे,अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली.
ही शेतकर्यांची राज्यव्यापी बैठक गुरुवारी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील राजश्री शाहू स्मारक भवन,दसरा चौकात होणार आहे. तरी या बैठकीस कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.महायुती सरकार गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. वेगवेगळे आराखडे तयार केले आहेत.पण कोणतेही अधिकृत परीपत्रक, अध्यादेश सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग बांधण्यासाठी ते खोट्या प्रचाराचादेखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की,या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे. १२ पैकी १० जिल्ह्यांमधील शेतकरी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत. २४ जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलनही १० जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना गृहखात्याकडून या सर्वांची माहिती दिली जाते. तरीदेखील वस्तुस्थितीचा विपर्यास करत नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा वक्तव्य केले की, शक्तीपीठ महामार्गाला सर्व आमदारांनी समर्थन दिले आहे. ही गोष्टदेखील पूर्णपणे खोटी आहे.