कोल्हापूर- विशाळगडावरील अतिक्रमण हटावा ही मागणी करीत संभाजी राजे यांनी काल आंदोलन केले . त्यावेळी विशालगडावर हिंसाचार झाला . त्यानंतर आज त्यांच्या विरोधात भूमिका घेत खासदार शाहू छत्रपती महाराज व आमदार सतेज पाटील आज विशाळगडावर पोहचले आणि त्यांनी पायथ्यालगत दगडफेक झालेल्या मुस्लीम वस्तीला भेट दिली. त्यावेळी मुस्लिम महिलांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांनी विनंती केली की, आमची काही चूक नाही. जिथे अतिक्रमण आहे त्यावर कारवाई करा. मुस्लिम वस्तीत दगडफेक, जाळपोळ, तोडफोड प्रकरणी ६० जणांविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल २१ जणांना अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज व आमदार सतेज पाटील हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले त्यावेळी त्यांना प्रशासनाने पांढरेपाणी येथे रोखले. जमावबंदी लागू असल्याने शाहू छत्रपती यांना रोखण्यात आले होते. पोलिसांनी यावेळी पत्रकारांची देखील अडवणूक केली. पत्रकार व पोलिसांमध्ये देखील झटापट झाली. कार्यकर्त्यामध्ये तणावाचे वातावर निर्माण झाले होते. अखेर सर्वांना गडांवर जाण्यास परवानगी देण्यात आली . काल हिंसक जमावाने जाळपोळ, तोडफोडीसह घरांवर हल्ले केले या प्रकरणावरून खासदार शाहू महाराज यांनी नाराजी व्यक्त केली .
काँग्रेस नेते अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची आज भेट घेतली. काँग्रेस नेते म्हणाले की, आम्ही कायदा व सुव्यावास्थेबाबत पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केली. या हिंसाचाराविरोधात शासनाने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजे. जमावाने लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांना मारहाण केली .