पुणे – पुणेकरांना प्रतिक्षा असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारित टर्मिनल आजपासून कार्यान्वित झाले. या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा होणार आहे. अत्याधुनिक सोईसुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळते.
पुणे विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ५२ हजार चौरस मीटर आहे. सर्वाधिक व्यस्त वेळेत त्याची ३ हजार प्रवासी क्षमता आहे. सुसज्ज व्यवस्थांसह या विमानतळाला ६ बोर्डिंग गेट आहेत. एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाची भित्तीचित्र, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीतील चित्रात घडते. विमानतळावर सुरक्षेसाठी लागणाऱ्या सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला. इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्यानंतर हे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला.