मुंबई- मुंबईतील कुर्ला भागात ईलेक्ट्रिक बेस्ट बसच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतील विक्रोळी परिसरात आणखी एक अपघात झाला. या अपघातात बेस्ट बसने दोन जणांना उडवले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास विक्रोळीच्या कन्नमवारनगर परिसरात बेस्ट बस चालक बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षातील स्वच्छतागृहात गेला. यावेळी बस अचानक सुरू झाली आणि एका टी स्टॉलला धडकली. तिथे उभ्या असलेल्या दोन कामगारांना बसने उडवले. यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बस चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कन्नमवार नगर बेस्ट बस डेपोचा परिसर हा अत्यंत वर्दळीचा आहे. येथून जवळच दोन महाविद्यालये आहेत. आज शनिवार असल्याने गर्दी कमी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र विनाचालक बस पुढे गेल्याने बस स्थानकात मोठा गोंधळ उडाला.