सांगली – सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. अनिकेत अमृत विभुते आणि विलास मारुती गूळदगड अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघे पाण्यात उतरले असता त्यांना विजेचा शॉक बसला.
अनिकेत विभूतेची माडगुळे इथे शेती आहे. त्यासाठी त्यांनी आटपाडी तलावातून १२ किलोमीटरची पाईपलाईन करून आपल्या शेतात पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युत पंप पाण्यात सोडला आहे. आज दुपारी अनिकेत आणि त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणी कमी झाल्याने पंप बाहेर आल्याचे त्यांना दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे दोघांनाही विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.