वाई- किकली येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे अवशेष सापडले आहेत. नाशिकचे पुरातत्त्वज्ञ सोज्वळ साळी आणि साताऱ्यातील अभ्यासक साक्षी महामुलकर यांचे संशोधन त्यादृष्टीने महत्वाचे ठरले आहे.
प्राचीन खेळ संवर्धन मोहिमेंतर्गत सध्या राज्यात प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध सुरू आहे. इतिहासात प्राचीन काळी मनोरंजनासाठी विविध खेळ खेळले जात असत.पचीसी, चतुरंगसारख्या कित्येक बैठ्या खेळांचा उगम भारतात झाला.समृद्ध प्राचीन व्यापारामुळेही काही खेळ आपल्या देशात आले. आजही त्यांचे कोरीव अवशेष प्राचीन लेणी, मंदिरे,घाट अशा ठिकाणी पाहावयास मिळतात. राज्यातील पुणे,नाशिक, सोलापूर,कोल्हापूर,वेरूळ आदी ठिकाणी प्राचीन व्यापारी मार्गाच्या खुणा प्रकाशझोतात आल्या आहेत.त्यात आता सातारा जिल्ह्यातील किकली गावची भर पडली आहे. येथील प्राचीन भैरवनाथ मंदिरात एकूण सात पटखेळांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत.नवकंकरी, वाघ- बकरी,पंचखेलिया अष्टचल्लस या प्राचीन बैठ्या खेळांचा त्यात समावेश आहे.प्राचीन इजिप्त,रोम,नेपाळ, सिलोन याठिकाणी अशा खेळांचे उगम,संदर्भ सापडतात.