मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यास १ जुलैपासून सुरूवात झाली. अर्ज वाटप केले जात असलेल्या कार्यालयांमध्ये महिलांची झुंबड उडत आहे. त्यात सध्या शेतीची कामे आहेत , वारीचा काळ आहे त्यामुळे या योजनेची मुदत १५ जुलैवरून ३० जुलैपर्यंत वाढवावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागांत सध्या शेतीची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे शेतीची कामे बाजूला ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र जमा करताना महिलांची तारांबळ उडत आहे. मोठ्या प्रमाणावर महिला पंढरीच्या वारीलाही गेल्या आहेत. म्हणूनच योजनेची मुदत पंधरा दिवसांनी वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या होत असलेल्या धावपळीचा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदत असू नये, अशी भूमिका मांडत १५ जुलैची मुदत रद्द करण्याची आग्रही मागणी केली.