मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या
योजनेवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.अशा परिस्थितीतही राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.विशेष म्हणजे त्याबाबतचा शासन निर्णय काल १५ ऑगस्ट रोजी सुट्टी असतानाही जारी करण्यात आला आहे.
या योजनेच्या प्रसिद्धीसाठी केल्या जाणार्या खर्चाच्या निधीला महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.मंजूर केलेल्या माध्यम आराखड्यानुसार फोन कॉल, सिनेमागृहे, एसटी स्टँड, मेट्रो, रेल्वे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे.या मंजूर खर्चामध्ये केवळ खासगी होर्डिंग्जवर २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ८.५० कोटी रुपये बेस्टच्या विजेच्या खांबावर,४ कोटी रुपये जाहिरात बनविण्यासाठी,५ कोटी रुपये खासगी वृत्तवाहिन्या व मनोरंजन वाहिन्या,रेडिओवर खर्च केले जाणार आहेत, स्थानिक केबल नेटवर्कवर ६ कोटी,खास परिसंवादावर २ कोटी तर मोबाईल स्टॉल आणि किऑस्कवर ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.