पुणे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली . मात्र तरीही सेतू केंद्रावर गर्दी उसळत आहे . याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी चालेल. त्यांना जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील एकाही मुलीच्या मनात अशी भावना येता कामा नये की माझे आई वडील गरीब असल्यामुळे मला शिक्षण घेता येत नाही. त्यांच्या मागे आता शासन उभे आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरताना उशीर झाला तरी चालेल . पण फॉर्म भरताना घाई करू नका. ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे देणार आहेत. एका घरातील दोन महिलांना तो लाभ मिळू शकतो . ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे. कोणतीही महिला मागे राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. एक मदतीचा हात म्हणून आपले शासन पुढे आले आहे आणि त्याप्रकारे आमचे काम सुरु आहे.