अहिल्यानगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात पहिल्यांच्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या मैदानाचे पूजन करण्यात आले. स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी रोहित पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवली आहे. महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात अभूतपूर्व पद्धतीने हे अधिवेशन यशस्वी करण्याचा प्रयत्न करू आणि कोणत्याही मल्लावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली.
ही स्पर्धा कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर २६ मार्च ते ३० मार्चदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध वजनी गटांतील ९०० हून अधिक नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलेले सर्व मल्लही या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या समारोपाला शरद पवार यांची उपस्थिती राहणार आहेत.