रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत नियमबाह्यरित्या बिल्डरला विकली

पनवेल – तब्बल १७ वर्षांपूर्वी बुडीत निघालेल्या रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेच्या इमारतींसह जमीन कवडीमोल भावात बिल्डरच्या घशात घातली आहे. या एकूण मालमत्तेची किंमत ४ कोटी असताना अवघ्या १ कोटीत बिल्डरशी हा व्यवहार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर चालू महिन्यात ६ जानेवारी रोजी खरेदी खत पूर्ण केल्याने बँकेचे ठेवीदार, सभासद संतप्त झाले आहेत. एव्हढेच नव्हे सर्वपक्षीय नागरिकांनी याविरोधात ‘आक्रोश’ समितीच्या माध्यमातुन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या व्यवहाराला स्थगिती द्याच शिवाय व्यवहार रद्द करा, अशी मागणी करण्यात आली आहे. याला खासदार सुनील तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँक रोह्याची अस्मिता होती. पण, कर्जदारांमुळे आर्थिक संकटात सापडून २००७ मध्ये बँक बुडीत निघाली. हजारो ठेवीदार, सभासदांचे तब्बल २० कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. असे असताना रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेच्या मुख्यालयाच्या विक्रीची निविदा प्रक्रिया ४ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर झाली आणि २३ ऑक्टोबर रोजी प्रक्रिया झाली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. अशातच ४ कोटींचे मूल्य असलेली इमारत व जागा अवघ्या १ कोटी १० हजारांना एकमेव निविदा असलेल्या बिल्डरला विकण्यात आली. बँकेची जमीन आणि इमारत विकण्याचा निर्णय हे नियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप ठेवीदार, सभासद करत आहेत. या प्रकरणी पत्रकार परिषद घेत ‘आक्रोश’ समितीचे समीर शेडगे, नितीन परब आणि अमित घाग यांनी बँकेच्या कस्टोडिअनवर ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसेच या व्यवहाराला स्थगिती देण्यासाठी रायगडमधील सर्व आमदार, मंत्री, खासदारांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बँकेच्या जमिनीचा आणि इमारतीचा व्यवहार कवडीमोल भावात झाला असून बिल्डरच्या घशात ही वास्तू घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

त्यामुळे हा व्यवहार कुणी केला, बँकेवरील प्रशासक आणि बिल्डरचे काही संबंध आहेत का, हे समोर यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याप्रकरणी बँकेच्या इमारत विक्रीला स्थगिती मिळावी म्हणून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. सहकार मंत्र्यांच्या कानावर रोहेकरांच्या तीव्र भावना घातल्या असून मंत्री आदिती तटकरे आणि त्यांचे इतर सहकारी लवकरच सहकार मंत्र्यांना स्थगितीसाठी पत्र देतील, असेही तटकरे यांनी सांगितले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top