रायगड
किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी आज सकाळी गडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका करण्यात आली. या सर्वांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आले. शिवाय आज शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैपर्यंत रायगडावर जाणारा पायरी मार्ग आणि रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व रायगड प्राधिकरणाच्या प्रमुखांमार्फत देण्यात आली.
रायगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसामुळे काल शेकडो पर्यटकांना तातडीने गडावरून खाली यावे लागले. सद्यस्थितीमध्ये रायगडाच्या पायरी मार्गावर व नाणे दरवाजा येथे पोलिसांनी बॅरिकेट लावून हा मार्ग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान काल टकमक टोक परिसरात असलेल्या धबधब्यावरून एक व्यक्ती वाहून गेला. मनोज खोपकर (४०) असे त्यांचे नाव आहे. ते रायगडवाडी येथील रहिवासी होते.