मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली आहे. तर,पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर होणारी ढगांची गर्दी वगळता इतर भागांमध्येही पावसाने दडी मारल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या मान्सूनने उघडीप दिली असली तरीही महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीस सुरूवात झाली आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्येही येत्या काही दिवसांमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईचाही पारा काहीसा वाढलेला जाणवत आहे. पावसाने माघार घेतल्यामुळे तापमानाच होणारी वाढ पाहता उष्णतेच्या या झळा काही साथीच्या आजारांनाही बोलावणे पाठवू शकतात. त्यामुळे हा उकाडा चिंता वाढविण्याची शक्यता आहे.