नाशिक- भूकंपाच्या धक्क्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरुपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.प्रारंभी कोयना,जायकवाडी,
गोसीखुर्द,उजनी अशा मोठ्या २५ ते ३० धरणांत ही उपकरणे बसविली जाणार आहेत.
वास्तविक धरणांमध्ये जलसाठा, भूगर्भातील हालचाली आदींचा वेध घेण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे कार्यरत असतात. मध्यंतरी धरण सुरक्षितता विभागाने प्रमुख धरणांमध्ये भूकंप मापनासाठी यंत्रणा उभारण्याची तयारी केली होती.मात्र भूकंप मापनाचे काम भारतीय हवामान विभागाकडे आहे.या विभागाचे एक केंद्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या नाशिक मुख्यालयात आहे.धरण सुरक्षितता कायदा लागू झाल्यामुळे धरणांच्या आरोग्याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले.त्यामुळे धरण सुरक्षितता विभागाने प्राधान्यक्रम बदलला. भूकंपमापनाऐवजी भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याचा भविष्यातील धरणांच्या रचनेत उपयोग होईल.त्या अनुषंगाने भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी त्वरणआलेखी उपकरणे म्हणजेच स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ बसविण्याचे निश्चित झाले. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जलविज्ञान आणि धरण सुरक्षितता विभागाचे मुख्य अभियंता सुदर्शन पगार यांनी दिली.