मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पावसाने काही भागात विश्रांती घेतली असली तरी कोकणात संततधार सुरुच असून विदर्भात आज जोरदार पाऊस झाला. अमरावतीसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जनवृष्टी झाली. अमरावती, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यात आज कोकणात पावसाची संततधार सुरुच राहिली. खेडमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुटी देण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. आजही कणकवली, कुडाळ, मालवण या शहरांमधील सखल भागात पाणी साचले. मुंबईत आज पावसाने उघडीप दिली. पालघर मध्ये पाऊस थांबल्याने भातशेतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. विदर्भात मात्र आज पावसाचा जोर दिसून आला. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले. या पावसाचा फटका शेतीलाही बसल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सद्श्य पाऊस झाला. त्यामुळे शेतीला अक्षरशः तलावाचे रुप आले. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, कळंब, बाभूळगाव, आर्णि, पुसद या भागात अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. यवतमाळ जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला तर उद्यापासून तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. त्यामुळे नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाने जिल्ह्यातून जाणाऱ्या अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाशिमच्या काही भागात मात्र पाऊस थांबल्यामुळे नुकसानीचे पंचनामे सुरु झाले. मध्य व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामधील काही भागात जोरदार पाऊस झाला. सांगली व सोलापूर जिल्ह्यांना पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात गेल्या दोन पडलेल्या पावसाने चांगलीच वाढ झाली आहे.