राजकीय नेत्याच्या मुलाचे हिट अ‍ॅण्ड रन महिलेला निर्दयीपणे फरफटत नेले

मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरला अल्पवयीन मुलाने केलेला अपघात आणि त्याला वाचवण्यासाठी कुटुंब व यंत्रणांची धडपड हे प्रकरण ताजे असतानाच आज मुंबईतही हिट अँड रनचा प्रकार घडला. राजकीय संबंध असलेल्या धनाढ्य व्यक्तीच्या मुलाने शनिवारी रात्री 18 हजारांचे मद्यपानाचे बिल देऊन बीएमडब्ल्यू ही महागडी गाडी चालवित एका कोळी दाम्पत्याला धडक दिली. त्यानंतर निर्दयीपणे त्या महिलेला काही अंतर फरफटत नेले. या अपघातात महिला जागीच ठार झाली. त्यानंतर हा मुलगा आणि त्याचा ड्रायव्हर फरार झाले होते. पण नंतर ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला पोलिसांनी अटक केली. तर मिहीर अजूनही फरार आहे. पुण्याच्या प्रकरणाच्या अनुभवावरून ड्रायव्हरला गुन्हा स्वतःवर घेण्यास भाग पाडले जाईल का? रक्ताचे नमुने घेताना बनवाबनवी केली जाईल का? मुलगा फरार असल्याने नंतर त्याने मद्यपान केले नव्हते असा अहवाल येईल का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे प्रदीप आणि कावेरी नाखवा हे दाम्पत्य पहाटे त्यांच्या दुचाकीवरून ससून डॉकला मासळी आणण्यासाठी गेले होते. मासळी घेऊन परतत असताना अँट्रिया मॉलजवळ एका बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे पतीचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटून दोघेही चारचाकी गाडीच्या बॉनेटवर पडले. पतीने प्रसंगावधान राखत बॉनेटवरून बाजूला उडी मारली. मात्र, महिलेला बाजूला होता आले नाही. ती पुढच्या बाजूला पडली. पती तिला बाजूला ओढणार तोच गाडी सुरू झाली आणि ती गाडीखाली अडकली. पती गाडी थांबवा थांबवा ओरडला, पण गाडी थांबली नाही. चालकाने तिला तसेच सी-लिंकपर्यंत फरफटत नेले. तिला तसेच रस्त्यावर जखमी अवस्थेत सोडून गाडी न थांबता निघून गेली. जखमी महिलेला तत्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही कार जप्त केली. ती एकनाथ शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांच्या नावावर नोंदल्याचे आढळले. अपघाताच्या वेळी शहा यांचा मुलगा मिहीर आणि ड्रायव्हर गाडीत होते, असे तपासात आढळले आहे. राजेश शहा आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांचा मुलगा फरार आहेत. तर चालकाला अटक झाली आहे. अपघातावेळी गाडी कोण चालवत होते, गाडीत कोण होते हे पाहण्यासाठी आता सीडीआर रेकॉर्ड पोलिसांकडून तपासला जात आहे. अपघाताच्या आधी मिहीरने जुहू येथील व्हॉईस ग्लोबल टापाज या बारमध्ये दारूची पार्टी केल्याचेही उघडकीस आले आहे. या पार्टीसाठी तब्बल 18 हजार रुपये खर्च करण्यात आले. या पार्टीचे काही फोटो मिहीरने स्वतःच सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. मृत महिलेचे पती प्रदीप नाखवा यांनी मिहीर हाच गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही सकाळी ससून डॉक येथे नेहमीप्रमाणे मासळी आणायला गेलो होतो. येताना तीस-पस्तीसच्या स्पीडने दुचाकी कडेने चालवत होतो. एकदम भरधाव बीएमडब्ल्यू गाडीने मागून आम्हाला टक्कर दिली. त्यानंतर त्याने ब्रेक लावल्यावर मी एका बाजूला पडलो आणि कावेरी गाडीखाली गेली. ते पाहून मी गाडी थांबवण्याची विनवणी केली, पण त्याने गाडी थांबवली नाही. तिला गाडीसोबत फरफटत नेले. मी एका टॅक्सीत बसून कारचा पाठलाग केला. दीड किलोमीटर अंतरावर टॅक्सीने प्रवास केल्यानंतरही कावेरी दिसून न आल्याने मी टॅक्सी वरळी पोलीस ठाण्यात वळवली. कारमध्ये आणखी एक माणूस होता. कार चालवणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळे माझी दोन मुले अनाथ झाली आहेत.
ज्या व्हॉईस ग्लोबल टापाज बारमध्ये मिहीरची मित्रांबरोबर पार्टी झाली होती. त्याचे मालक करण शहा यांनी खुलासा केला आहे की, मिहीर शहा हा मित्रांसोबत रात्री 11 वाजताच्या सुमारास आला होता. त्या सर्वांना एकाच प्रकारचे पेय दिले, ते काही जास्त प्यायले नाहीत. ते दीड वाजताच्या सुमारास व्यवस्थित चालत बारमधून बाहेर पडले आणि मर्सिडिज गाडीत बसून गेले.(ती बीएमडब्लू गाडी नव्हती)
पुण्यातील पोर्श प्रकरणातील आरोपीप्रमाणे या प्रकरणातील आरोपीही धनिकपुत्र असल्याने या अपघातानंतरही राजकारण सुरू झाले आहे. वरळी येथील या घटनेनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले की, सीसीटीव्हीमध्ये एक मुलगा गाडी चालवताना दिसला आहे. ही गाडी कोणत्याही पक्षाच्या नेत्याची असली तरी राजकीय हस्तक्षेप नको. दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली. पुण्यातील पोर्श प्रकरणाचा अनुभव लक्षात घेऊन हिट अँड रनच्या या आणखी एका प्रकरणानंतर पोलीस प्रामाणिकपणे तपास करून कारवाई करणार की तपासात अनेक उणिवा ठेवून त्याच्या सुटकेचा मार्ग सोपा करतात, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. कारण मिहीर फरार असून, तो हाती लागल्याशिवाय त्याच्या रक्ताचे नमुने घेता येणार नाहीत. ते जेवढे उशिरा घेतले जातील, तेवढे त्यांनी त्या रात्री मद्यपान केले असल्याचे सिद्ध करणे अवघड होईल.
कोणालाही पाठीशी घालणार नाही-एकनाथ शिंदे
अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून गृह विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कायद्याच्या समोर सर्व समान आहेत. कोणालाही पाठीशी घालणार नाही. मागील घटनेप्रमाणे या वेळीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top