वॉशिंग्टन- युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. युक्रेन व रशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी ते आले होते. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धाच्या वेळी अमेरिकेने युक्रेनला जी आर्थिक मदत केली त्याबदल्यात अमेरिकेला आता युक्रेनमधील दुर्मीळ आणि मौल्यवान खनिज संपत्तीवर ताबा हवा आहे. ही संपत्ती अमेरिकेच्या हवाली करण्याचा दबाव अमेरिकेने आणल्यावर त्याबाबतचा करार करण्यासाठी ते अमेरिकेत आले होते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची काल व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. मात्र या भेटीत ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादावादी झाल्यामुळे खनिज संपत्ती बाबतीतील करार होऊ शकला नाही. मात्र, हा आम्हाला करार आम्हाला करावाच लागेल, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. यामुळे येत्या काळात हा करार होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रशियाशी युद्ध करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे झेलेन्स्की यांच्यावर देशातील खनिजे अमेरिकेच्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे. नेते चुका करतात आणि त्याची किंमत देशाला चुकती करायला लागते, याचे हे उदाहरण आहे. युध्दासाठी झेलेन्स्की यांनी अमेरिकेची मदत मागितली तेव्हा अमेरिका या मदतीचा मोबदला मागणार हे उघड होते. मूळची ही व्यापारी रचना लपविण्यासाठी ‘मानवतावादी दृष्टिकोन’ यातून युक्रेनला मदत केली ही अमेरिकेची भाषा होती. किंबहुना भांडवलशाही देशांची हीच भाषा असते. त्यामुळे आपल्याला मोबदला द्यावा लागणार हे माहीत असूनही केवळ माघार घेतल्याने प्रतिमेचे नुकसान होईल म्हणून झेलेन्स्की यांनी युद्ध रेटत नेले आणि आता आपला देश विकायला काढला आहे . यात देशभक्तीने सर्वस्व ओवाळून टाकणारे सैनिक आणि सामान्य माणसे यांचे मात्र अतोनात नुकसान होते.
काल ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात आधी चर्चा झाली. ही चर्चा अर्थपूर्ण झाली असे ट्रम्प म्हणाले. त्यानंतर सर्वांसमोर त्यांची पुन्हा 50 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत मात्र दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही नेते एकमेकांकडे बोट दाखवून बोलताना दिसले. व्हाईट हाऊसच्या इतिहासात दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये प्रथमच एवढे तणावपूर्ण संभाषण झाले. अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यावेळी उपस्थित होते. त्यांनी झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप केला. ट्रम्प यांनीही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अनेकदा फटकारले. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर तिसऱ्या महायुद्धासाठी जुगार खेळल्याचा आरोप केला. यानंतर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. ट्रम्प यांना युक्रेनच्या खनिजावर ताबा हवा आहे तर हा ताबा देण्याच्या बदल्यात झेलेन्स्की यांना अमेरिकेकडून संरक्षणाची हमी हवी आहे. ट्रम्प ही हमी देण्यास तयार नाहीत . त्यांचे म्हणणे आहे की अमेरिकेने आतापर्यंत जी मदत केली त्या बदल्यात खनिजांचा करार व्हावा, झेलेन्स्की यांच्या अधिक मागण्या मान्य नाहीत . यातूनच ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यात काल वाद झाला. पण शेवटी झेलेनस्की यांना सर्व मान्य करावेच लागणार आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
या वादविवादानंतर झेलेन्स्की बाहेर पडून दुसऱ्या खोलीत गेले. त्यानंतर ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती व्हान्स, परराष्ट्र मंत्री रुबिओ आणि एनएसए माईक वॉल्ट्ज यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प म्हणाले की झेलेन्स्की वाटाघाटी करण्याच्या स्थितीत नाहीत. झेलेन्स्की यांनी माफी मागत म्हणून पुन्हा ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही होणार होती ती रद्द करण्यात आली. नंतर जारी करण्यात आलेल्या पत्रकात ट्रम्प म्हणाले की, व्हाईट हाऊसमध्ये आज अत्यंत अर्थपूर्ण चर्चा झाली. ती झाली नसती तर अनेक गोष्टी कळल्या नसत्या. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे शांततेसाठी तयार नाहीत कारण त्यांना वाटते की, या वाटाघाटीत आमचा मोठा फायदा होणार आहे . मला कुठलाही फायदा नको. मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अपमान केला आहे. ते शांततेसाठी तयार होतील, तेव्हा परत येऊ शकतात.
झेलेन्स्की यांचा अमेरिका दौरा होण्याआधीच बराच गाजत होता. झेलेन्स्की यांनी दौऱ्याच्या 24 तास आधी तो रद्द केला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर तो पार पडला. युक्रेनच्या दुर्मिळ खनिज स्रोतांचा ताबा अमेरिकेला देणे हा दौऱ्यातील महत्त्वाचा विषय होता. या खनिज करारातील सुरुवातीच्या मसुद्यांमध्ये युक्रेनचे शोषण करणारे काही प्रस्ताव असल्याचे कारण देऊन झेलेन्स्की यांनी तो नाकारला होता. त्यानंतर युक्रेनला युद्धानंतर पुनर्बांधणीसाठी आपल्याकडील स्रोतांचा वापर करण्यास अधिक स्वायत्तता देणारा नवीन करार तयार करण्यात आला. झेलेन्स्की यांच्याकडे फारसे पर्याय नव्हते, असे विश्लेषकाचे म्हणणे आहे. युक्रेनमध्ये युरोपियन युनियनने ज्या 34 खनिजांचा मौल्यवान म्हणून उल्लेख केला आहे, त्यातील 22 प्रकारची खनिजे युक्रेनमध्ये आढळतात. त्यामध्ये लोखंड, पोलाद, लिथियम, टायटॅनियम, ग्रॅफाइट यांचा समावेश आहे. यात अतिदुर्मीळ खनिजेही आहेत. युक्रेनचा भूभाग जगाच्या फक्त 0.4 टक्के इतका असला, तरी जवळपास 5 टक्के खनिजे या देशात आहेत. अमेरिकेकडून मदत हवी असेल तर युक्रेनने त्यांच्याकडील 50 टक्के मौल्यवान खनिजांची (क्रिटिकल मिनरल्स) मालकी हवी, अशी अट ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना घातली आहे. मात्र, या खजिन्यांच्या बदल्यात अमेरिकेने युक्रेनला संरक्षण द्यावे, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली आहे.
झेलेन्स्की- ट्रम्प संभाषण
झेलेन्स्की – युद्धाचा तुम्हालाही त्रास होतो आहे. पण देवाची कृपा आहे की, तुमच्याकडे युद्ध नाही
ट्रम्प – आम्हाला काय वाटेल, हे आम्हाला सांगू नका.
झेलेन्स्की – मी तुम्हाला सांगत नाही. मी त्यांच्या (व्हान्स यांच्या) प्रश्नाला उत्तर देतो आहे.
ट्रम्प – लक्षात घ्या की आम्हाला काय वाटते हे सांगण्याची तुमची परिस्थिती नाही. तुम्ही चांगल्या स्थितीत नाही. तुमच्याकडे खेळायला एकही पत्ता नाही. आम्ही तुमच्यासोबत असू तर तुमच्याकडे पत्ते असतील. तुम्ही पत्ते खेळत आहात. तुम्ही जुगार खेळत आहात. लाखो लोकांशी जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात.
व्हान्स – तुम्ही संपूर्ण बैठकीत एकदाही धन्यवाद म्हटलेले नाही.
झेलेन्स्की – तुम्हाला वाटते की तुम्ही मोठ्याने बोललात, तर तुम्ही…
ट्रम्प(त्यांना मध्येच अडवत) – ते मोठ्याने बोलत नाहीत. तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही जिंकत नाही.
झेलेन्स्की – मला माहिती आहे. आम्ही एकटेच लढत आहोत.
ट्रम्प – हे चुकीचे आहे , आम्ही तुम्हाला 350 बिलियन डॉलर इतकी मदत केली म्हणून तुम्ही टिकलात , नाहीतर दोन आठवड्यात तुमचा पराभव झाला असता. तुम्हाला आमच्यामुळे यातून बाहेर पडायची खूप मोठी संधी आहे.
झेलेन्स्की – तीन दिवसांत… मी पुतीनकडून ऐकले आहे.
युक्रेनची खनिजे अमेरिकेच्या ताब्यात? झेलेन्स्की संकटात
