पुणे- गेल्या दोन महिन्यांपासून विविध डाळींच्या भावांत मोठी घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनात वाढ झाल्याने तूरडाळीच्या दरात किलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट दिसत आहे. तूरडाळीसह चणाडाळीच्या दरात १५ ते २० रुपये, तसेच उडीद डाळीच्या दरात पाच ते सात रुपयांनी घट झाली आहे.
सध्या कर्नाटकातील तूरडाळीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज तुरीचे ट्रक दाखल होत आहेत. यंदा कर्नाटकात तूरडाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगामही सुरू झाला आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरांत प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. जून-जुलै महिन्यात तूरडाळीचे दर कडाडले होते. त्यावेळी घाऊक बाजारात एक किलो तूरडाळीला १७५ रुपये किलो असा उच्चांकी दर मिळाला होता. नोव्हेंबरमध्ये दरात दहा रुपयांनी घट झाली. सध्या घाऊक बाजारात डाळीचे प्रतिकिलोचे दर प्रतवारीनुसार १०७ ते १३० रुपये किलोदरम्यान आहेत.