यंदाही गणेशभक्तांसाठी टोल माफी! मंडपासाठी भाड्यात ५० टक्के सूट

मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका,अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवाय गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.

गेल्यावर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे.खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top