मुंबई – तिसर्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबई दौर्यावर आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दौर्यात त्यांनी मुंबईतील 29,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमात ते म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास हेच आमचे लक्ष्य आहे. पुढील काही वर्षात आम्ही मुंबईला जगाची आर्थिक राजधानी करणार आहोत.
गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमीपूजन (6,600 कोटी), गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमीपूजन (6,300 कोटी), कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी (813 कोटी), तुर्भे येथे गती शक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी (7 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 चे राष्ट्राला समर्पण (52 कोटी), लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला लोकार्पण (64 कोटी), तुर्भे येथे गती शक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी (27 कोटी) केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या 30 हजार कोटींच्या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आसपासच्या प्रकल्पांची कनेक्टिव्हीटी चांगली होईल. यात रस्त्यांव्यतिरिक्त रेल्वेच्याही प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय तरुणांच्या कौशल्य विकासाची योजना आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. दोन-तीन आठवड्यांपूर्वीच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 76 हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या एक महिन्यात मुंबईत देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राकडे उद्योगांची शक्ती आहे. कृषीची शक्ती आहे. आर्थिक ताकद आहे. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. महाराष्ट्राला मोठे आर्थिक केंद्र बनविणे हे माझे लक्ष्य आहे. या शक्तीने मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवायची आहे. पर्यटनात महाराष्ट्राला नंबर 1 बनवायचे आहे. भारत सध्या विकासाची गाथा लिहित आहे. आजचा कार्यक्रम त्याची झलक आहे.
मुंबईतील अनेक प्रकल्पांचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, देशातील जनतेला वेगवान विकास व्हावा, असे वाटते. पुढील 25 वर्षांत भारताला विकसित देश बनवायचा आमचा प्रयत्न आहे. त्यात मुंबईचा मोठा वाटा आहे. मुंबई आणि परिसरातील कनेक्टिव्हीटी चांगली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अटल सेतू आणि कोस्टल रोड याची उदाहरणे आहेत. अटल सेतूवरून रोज 20 हजार गाड्या जातात. त्यामुळे 20-25 लाख रुपयांचे इंधन वाचते. वेळ आणि पर्यावरणाचा फायदा होतो. यादृष्टीने मुंबईतील वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवायची आहे. मुंबई मेट्रोचा वेगाने विस्तार होत आहे. 10 वर्षांपूर्वी मुंबईत 8 किलोमीटरची मेट्रो होती. ती आता 80 किलोमीटर इतकी झाली आहे आणि 200 किलोमीटर मेट्रोचे काम चालू आहे. भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत आहे. त्याचा मुंबईला फायदा होत आहे.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भाषणे झाली. एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारला मोदींचे पाठबळ आहे. मोदींच्या हाताला परिसस्पर्श आहे. गेल्या सरकारने मुंबईच्या विकासाला स्पीड ब्रेकर टाकले. आम्ही ते दूर केले. महायुतीने मुंबईत पायाभूत विकासाचे जाळे विणले.
राधिका-अनंत अंबानीच्या
लग्नसोहळ्याला मोदींची उपस्थिती
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा काल विवाह संपन्न झाल्यानंतर आज रात्री बीकेसी येथे स्वागत समारंभ पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशीर्वाद दिला. या सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि दिग्विजय सिंह, चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, काँग्रेसचे नेते कमलनाथ आणि आदी मान्यवरांनी
हजेरी लावली.