मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यात दाणादाण उडाली लोकल ठप्प, शाळांना सुट्टी, आमदारही गाड्यांमध्ये अडकले

मुंबई – काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल रेल्वे सेवा पार विस्कळीत झाली. सखल भागांमध्ये दोन-अडीच फूट पाणी साचल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाली. सर्वसामान्यांबरोबरच पावसाचा फटका आमदारांनाही बसला. विधानसभेच्या अधिवेशनासाठी मुंबईकडे निघालेले विदर्भ मराठवाड्यातील दहा-बारा आमदार रेल्वेगाड्यांमध्ये अडकून पडले. पावसामुळे पहिल्यांदाच कोणतेही कामकाज न करता अधिवेशन रद्द झाले. मंत्रिमंडळ बैठक रद्द झाली आणि ओबीसी आरक्षण सर्वपक्षीय महत्त्वाची बैठकही रद्द झाली.
आपत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी व जोगेंद्र कवाडे कुर्ल्याजवळ रेल्वे रखडल्याने रुळांवरून चालताना दिसले.
राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय आपत्ती निवारण कक्षाची (एनडीआरएफ) 12 पथके तैनात करण्यात आली. विधानसभेचे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाजही दुपारी एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर निवेदन केले.आमदार आणि कर्मचारी पोहोचू न शकल्याने विधानसभेचे कामकाज फडणवीस यांच्या निवेदनानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
पुण्याहून मुंबईला येणार्‍या सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. नाशिकहून मुंबईकडे येणार्‍या रेल्वे गाड्या दीड दोन तास उशिराने धावत होत्या.सकाळी नाशिकहून मुंबईला येणारी पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर जागोजागी पाणी तुंबल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या. कर्जत- मुंबई विशेष रेल्वेगाडीही रद्द करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7 वरून सुटणार्‍या सर्व लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या. ठाण्याच्या सॅटीस पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. प्रभादेवी, दादर येथील सखल भागांत गुडघाभर पाणी साचले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरहून येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस कल्याणजवळ थांबली. त्यानंतर गाडीतून उतरून मुश्रीफ आपल्या मित्राच्या गाडीतून मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र ते वाहतूक कोंडीमध्ये अडकले. पावसामुळे विमान उड्डाणाला पाच तास उशीर झाल्याने नागपूर विमानतळावर पाच आमदार अडकून पडले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पावसाने फटका बसला. सकाळी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. तर काही उड्डाणे पुढे ढकलण्यात आली.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात काल मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आज सकाळी सात वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. अवघ्या सहा तासांत मुंबईत तब्बल 300 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने गुडघाभर पाणी साचल्याने मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या ठिकाणी एक कार आणि एक ट्रक पाण्यात अडकला होता. क्रेनच्या सहाय्याने या गाड्यांना तेथून
उचलण्यात आल्या.
अंधेरी सबवे परिसरातही दोन अडीच फूट पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूकही काही काळ ठप्प झाली. गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीमधून जाणारा आणि गोरेगाव ते मरोळला जोडणारा रस्ताही अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या लोकांचे प्रचंड हाल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाला जातीने भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे पहिल्यांदा सकाळच्या सत्रातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी देण्यात आली.


पवईत सर्वाधिक पाऊस
मुंबईत पवई परिसरात सर्वाधिक 329 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंधेरीमध्ये 303.80, गोरेगाव, आरे दुग्ध वसाहत 273.60, मरोळ परिसरात 252.40 तर सायन येथे 248.20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पाऊस
एनडीआरएफ पथक सज्ज! शाळांना सुट्टी

काल सकाळपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. सिंधुदुर्गला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली तर बचावकार्यासाठी एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी तीन नद्या धोका पातळीच्या वरून तर तीन नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गावाला पाण्याने वेढले. संपूर्ण गावात पाणी साचले आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली. यामुळे राजापूर शहरात पाणी घुसले. येथील जवाहर चौक पाण्यात बुडाला, तर रस्त्यावर अडीच ते तीन फूट पाणी साठले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वरची पेठ रस्ता देखील पाण्यात बुडाला. काही घरांत पाणी घुसले असून, नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य राबवले. राजापूर, चिपळूण, संगमेश्वरच्या बाजारपेठेत पाणी शिरले असून, मोठे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातल्या हुमरमळा जवळ मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. तर हाथेरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पुराचे पाणी शेतात व काही नागरिकांच्या घरात घुसले. एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. येथील तेरेखोल नदी, कर्ली नदी, वाघोटन नदी दुथड्या भरून वाहत आहेत. नदी काठच्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले. भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. वैभववाडीमधील तीथवली येथे देखील मुसळधार पावसामुळे घर कोसळले. तर कुडाळमधील माणगाव खोर्‍यातील निर्मला नदीच्या पुराच्या पाण्यात रस्ता उखडून खड्डा पडल्याने 27 गावांचा संपर्क तुटला. कुडाळ पावशी येथील 5 ते 6 कुटुंबे पाण्यात अडकली होती. एनडीआरएफ पथकानी सुटका केली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातील मालपे पेडणे भागात दरड कोसळली. येथील संरक्षक भिंत कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पेडणे शहरातून वळवण्यात आली. मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला देखील बसला असून, या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसाने रायगड माणगावमधील रस्त्यावर मोठा खड्डा पडला. या खड्ड्यात एक व्यक्ती पडला आणि पावसाच्या पाण्यात वाहून गेला. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण
करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top