मुख्यमंत्री वैद्यकीय निधी असताना शिंदेंच्या स्वतंत्र निधीची स्थापना

मुंबई- राज्यातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन करणार आहेत. 4 मार्च रोजी त्याचे उद्घाटन आहे. राज्यात आता दोन शासकीय वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष होणार आहेत. त्यामुळे फडणवीसांवर एकामागोमाग कुरघोड्या करून एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये समांतर सत्ताकेंद्र तयार करू पाहत आहेत, अशी चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या कामगिरीची भरपूर वाखाणणी झाली होती. या कक्षाने त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात 51 हजार रुग्णांना एकूण 419 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. या मदतीमुळे एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी रुग्णांच्या मदतीसाठी आता उपमुख्यमंत्र्याच्या नावाने स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 मार्चला शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय निधी कक्षाचे उद्घाटन होणार आहे. या कक्षाचे व्यवस्थापन मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरून केले जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचे काम मात्र 7 व्या मजल्यावरून चालते. शिंदे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचीच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ते आधी शिंदे यांचे विशेष अधिकारी होते. फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखपदावरून त्यांना हटवून दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती.
शिंदे यांच्या स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, या सरकारमध्ये जनतेची कामे कमी आणि एकमेकांवर कुरघोड्याच जास्त सुरू आहेत. प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वतंत्र कक्ष स्थापन झाले आहेत. आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर एका उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू केला असून, दुसरे उपमुख्यमंत्री देखील लवकरच वैद्यकीय मदत कक्ष सुरू करतील असे वाटते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या या कुरघोड्या बघता, सरकारने आपले ब्रीदवाक्य ‘कुरघोड्या हीच आमची प्राथमिकता’ असे करायला हरकत नाही. तर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, स्वतंत्र उपमुख्यमंत्री कक्षाची स्थापना केली असेल तर त्याचे कौतुकच करायला हवे. एखाद्या गरीब, गरजू माणसाला मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य असते. त्यात कुणीही कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. वैद्यकीय कक्ष हे स्पर्धा करण्याचे माध्यम नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top