मुंबई- नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गायब झाले आहेत. या तिघांनी महाराष्ट्र जणू वाऱ्यावर सोडला आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली, पण दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने वातावरण तापले आहे. तरीही दोन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी आजपर्यंत त्यावर वक्तव्य केले नाही. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार होती. ही भेटही झाली नाही. गेले चार दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यावेळी शेताकडे फिरकलेच नाहीत. गेल्या पूर्ण आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकही झालेली नाही. राज्याची धुरा ज्यांच्या हाती दिली ते तिघेजण आहेत कुठे, असा सवाल विचारला जात आहे.
विशेष म्हणजे मंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर नाराज झालेले छगन भुजबळ, राणा दाम्पत्य, दत्ता भरणे, प्रकाश सुर्वे, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, विजय शिवतारे, नरेंद्र भोंडेकर हे नेते दिसेनासे झाले आहेत. मंत्रिपद वाटपानंतर पालकमंत्री नेमण्यात येणार होते तो निर्णय झाला नाही. किंबहुना त्याबाबत एकही बैठक झालेली नाही. एकूणच सरकार ठप्प आहे. मंत्रालयात अधिकारीही काम करण्याच्या मानसिकतेत नाहीत. 31 डिसेंबरची मौज झाल्यानंतरच मंत्रालयात कामकाज सुरू होईल, असे सांगितले जात आहे.
दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांना लगेच मंत्रालयातील दालन आणि सरकारी निवासस्थानांचे वाटप झाले होते. मात्र अजूनही 39 पैकी 16 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. यात भाजपाचे मंत्री अतुल सावे, आशिष शेलार, मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ, पंकज भोयर याचा समावेश आहे. तर शिंदेंच्या गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, योगेश कदम, आशिष जयस्वाल, बाबासाहेब पाटील तर अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे यांनी अजून पदभार स्वीकारला नाही.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे या वर्षातील राहिलेल्या दोन दिवसांमध्ये पदभार स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. तसेच 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक मतदारसंघांत जंगी कार्यक्रम आहेत. त्यामुळेही हे मंत्री आपापल्या मतदारसंघात आहेत. नव्या वर्षात मतदारांच्या भेटीगाठी घेत, त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत हे मंत्री पुढील आठवड्यात मुंबईत येण्याची शक्यता आहे.