मुंबई – मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.पालिकेमार्फत हा रस्ता शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.या प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सव काळात मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत २४ तास वाहतुकीसाठी खुला होता. आता आज शनिवारपासून आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
दक्षिणवाहिनी मार्ग बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका,तसेच उत्तरवाहिनी मरीन ड्राइव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे.तसेच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (दक्षिण) उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत.वाहनचालकांनी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.वाहतूक शिस्त पाळावी.वाहने चालविताना अधिकची काळजी घ्यावी. अपघात टाळावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.