मुंबई- वयाच्या १६ व्या वर्षातील सर्वसामान्य मुले- मुली ही एकतर अभ्यासात नाहीतर मोबाईलच्या खेळात गुंग झालेली दिसतात.मात्र मुंबईकर
काम्या कार्थिकेयन (१६) या नौदल शाळेत बारावीत शिकणार्या मुलीने जागतिक विक्रम करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.काम्याने जगाच्या सात खंडातील सातही सर्वोच्च शिखरे सर केली आहेत.
मुंबईकर काम्या कार्थिकेयन (१६) हिने चार दिवसांपूर्वी म्हणजेच २४ डिसेंबर रोजी अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट व्हिन्सेटवर पाऊल ठेवून इतिहास घडवला आहे. सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून तिने सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर केली आहेत.यंदाच्या मे महिन्यात माऊंट एव्हरेस्ट हे शिखर दक्षिण बाजूने सर केले होते. असा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला व दक्षिण बाजूने शिखर सर करणारी दुसरी महिला ठरली. आफ्रिकेतील माऊंट किलीमांजरो -ऑक्टोबर २०१७, युरोपातील माऊंट एल्बरस-जून २०१८, ऑस्ट्रेलियातील माऊंट कोस्युस्को-नोव्हेंबर २०१८, दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकॉनग्वा -फेब्रुवारी २०२०, उत्तर अमेरिकेतील माऊंट डेनाली-फेब्रुवारी २०२२, नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट – मे २०२४ ही शिखरे तिने सर केली आहेत.वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षांपासून काम्याने गिर्यारोहणाला सुरुवात केली.तिने ट्रेक करून चंद्रशीला शिखर गाठले. त्यानंतर तिने एकापाठोपाठ सात सर्वोच्च शिखरे सर करत ती जगातील सर्वात तरुण महिला बनली आहे. दरम्यान,काम्याच्या या जगविख्यात पराक्रमाबद्दल तिचे व तिच्या वडिलांचे शाळेने व नौदलाने अभिनंदन केले आहे. काम्या हिला ‘पीएम राष्ट्रीय बालशक्ती’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात ‘मध्ये तिचे कौतुक केले होते.