मुंबई – बीड जिल्ह्यातून मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून दिवसाला ७०० ते ८०० धमकीचे फोन येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला.दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फोन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या की, बीडमध्ये उच्चपदावर वंजारी लोक आहेत, असे मी बोलले होते. कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात मी बोलले नाही. परळीमध्ये जे सर्व सुरू आहे त्या विरोधात मी भाष्य केले. मात्र माझे वक्तव्य मोडूनतोडून समाज माध्यमावर टाकले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा प्रचंड मानसिक छळ होत आहे. मला चार दिवसांपासून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे, वाल्मिक कराड याचा समर्थक सुनिल फड हे फोन सतत करत आहे. नरेंद्र सांगळे हा धनजंय मुंडेचा निकटवर्ती आहे. पहिल्या दिवशी ७००-८०० कॉल आले. कॉल अजून बंद झालेले नाहीत. नरेंद्र सांगळे यांनी समाजाला भडकावण्याचे काम केले. माझा एक फोटो सुनील फड यांनी फेसबुकवर पोस्ट केला असून त्यावर अत्यंत खालच्या भाषेत कमेंट केली जात आहे. सुनील फड यांना वंजारी समाजाबद्दल आस्था असती तर त्यांनी हे केले नसते. ह्यांची अख्खी फौज माझ्या मागे लागली आली. नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकला आहे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. मी त्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची ७ जानेवारीला भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंजली दामानियांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. पोलीस योग्य ती कारवाई त्यांच्यावर करतील.