मुंबई- अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि विभक्त पत्नी करुणा शर्मा यांच्यातील न्यायालयीन वादावर त्यांचा मुलगा सीशिव मुंडे याने प्रतिक्रिया देत आपल्या आईवरच आरोप केले. त्यावरून करुणा शर्मा-मुंडे संतप्त झाल्या आहेत. आपल्या मुलांना आपल्या विरोधात उभे केले जात असल्याची तक्रार करत त्यांनी आता पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप केले आहेत. त्या आज म्हणाल्या की, मी अद्याप तोंड उघडले नाही. पण तोंड उघडले तर धनंजय मुंडेच काय, पंकजा मुंडे यांचेही मंत्रिपद जाईल.
करुणा शर्मा-मुंडे म्हणाल्या की, मला जर बोलायचेच असेल तर मी कुठेही बोलेन. कॅबिनेटमध्येही येऊन बोलेन. काहीही झाले तरी आमचा घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे ते मला रस्त्यावर सोडू शकत नाहीत. 27 वर्षांपासून मी धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. माझ्या आईच्या निधनाच्या वेळी माझ्या कुटुंबावर दबाव आणला होता. त्यानंतर माझ्या बहिणीने धनंजय मुंडेंवर लैंगिक अत्याचाराची केस केली तेव्हा त्यांनी तिला पाठिंबा देऊ नको असे मला सांगितले. आता ते माझ्या मुलांना माझ्या विरोधात उभे करत आहेत. धनंजय मुंडे हे मुद्दाम कारस्थान रचत आहेत. फूट टाका आणि राज्य करा हे त्यांचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. स्वत: काहीच बोलत नाहीत आणि माझ्या विरुद्ध माझ्याच मुलाला उभे करतात. गेले अनेक दिवस माझा मुलगा अस्वस्थ होता.
त्याचे काही बरे वाईट झाले तर हा माणूस स्वत:ला माफ करू शकणार आहे का? माझ्या मुलाने त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून स्टोरी टाकली होती. पण अनेक मोठ्या गोष्टी आहेत. 1996 पासून काय झाले ते मी उघड करणार आहे. पंकजा मुंडेंनी काय केले, धनंजय मुंडे सोबत काय केले, धनंजय मुंडेने पंकजा मुंडेंसोबत काय कटकारस्थाने रचली, गोपीनाथ मुंडे साहेबांविरोधात काय कटकारस्थान रचले गेले, यांचे किती आका आहेत हे सगळे मी जाहीर करणार आहे. मी जर तोंड उघडले तर पंकजा मुंडेंचेदेखील मंत्रिपद जाईल.
2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या काळात महिला आणि बालविकास मंडळाच्या पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. 206 कोटींचा चिक्की आणि बेबी किट घोटाळा, 106 कोटींचा मोबाईल खरेदी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांत त्यांचे नाव आले होते. चुलतभाऊ धनंजय मुंडे यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध अनेक वर्षे बिघडलेले होते. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत भाजपाबरोबर गेल्यावर दोघांतील संबंध सुधारले. आता करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय यांच्याबरोबर पंकजा मुंडे यांचाही पर्दाफाश करणार असल्याचे सांगितल्याने त्याची चर्चा होत आहे.
मी तोंड उघडले तर पंकजाचे मंत्रिपद जाईल! करुणा मुंडेंचा इशारा
