मिरा-भाईंदर महापालिका सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी कर्ज घेणार

भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिका शहरातील विविध भागांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविणार आहे. काही रस्त्यांचे काम एमएमआरडीए व पालिकेने सुरू केले आहे. पण पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने काही रस्त्यांचे काम सुरू करणे बाकी आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेणार आहे. बँकेनेही कर्ज देण्यास होकार दिल्याचे सांगितले जात आहे.
या महापालिकेने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामासाठी सुरुवातीला बँक ऑफ बडोदा या बँकेकडे कर्ज मागितले होते. मात्र या बँकेने कर्जास नकार दिल्यानंतर आता ‍या आयडीबीआय बँकेकडे मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी शहरात पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी सिमेंट काँक्रिट रस्ते बनवण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे.

महापालिकेने शासनाकडे सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन पालिकेला निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर एमएमआरडीए आता शहरातील २१.८० किमीचे ४७ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार आहे. त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. पालिकेने एकूण २३.७९ किमी पर्यंतच्या ३७ रस्त्यांचे काँक्रीटीकरण प्रस्तावित केले आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याने पालिकेने राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार आता ५०० कोटी रुपयांचे कर्ज आयडीबीआय बँकेकडून घेतले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top