सांगली- प्रयागराज येथे होणार्या महाकुंभ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरज ते जयनगर(बिहार) विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे प्रयागराजमार्गे धावणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून प्रयागराजसाठी जाणार्या प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी ही विशेष रेल्वे मिरजेतून सुटेल. ही गाडी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. तसेच रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी प्रयागराज चौकी येथे पोहोचेल, तर दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ही विशेष रेल्वे जयनगर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष रेल्वे जयनगर येथून प्रत्येक मंगळवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसर्या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी प्रयागराज चौकी येथे येईल, तर मिरज येथे रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. या विशेष रेल्वे गाडीला पुणे, मनमाड, प्रयागराज चौकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, मोकामा, बरोणी, समस्तीपूर, दरभंगा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.