मुंबई – मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचते .!मायक्रो टनेलिंग तसेच पम्पिंग स्टेशनची कामे पूर्ण झाल्यावर हे पाणी साचणार नाही. पावसाच्या साचणाऱ्या पाण्यापासून दिलासा मिळेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महापालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता पावसाचे पाणीस साचते. ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास अतिवृष्टी झाल्याचे बोलले जाते. रात्रभरात ३०० मिलीमीटर पाऊस पडल्याने पाणी साचले, मात्र उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले नाही. मुंबईत हिंदमाता येथे पाणी उपसायचे पम्पिंग स्टेशन उभारल्याने तेथे पाणी साचले नाही. मुंबईत पालिकेच्या ४८१ आणि रेल्वेच्या १५० पंपाद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मायक्रो टनेलिंग केले आहे. असेच मायक्रो टनेलिंग रेल्वे परिसरात तसेच सखल भागात केले जाईल. समुद्रातील भरतीचे पाणी शहरात येऊ नये म्हणून फ्लड गेट बसवले जातील. मिठी आणि पोईसर नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोगरा आणि खार येथे पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पम्पिंग स्टेशन उभारण्यात येईल. पम्पिंग स्टेशन उभारल्यावर मुंबईमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही. साचणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळेल असा दावा मुख्यमंत्रीनी केला.