पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील बारदेश तालुक्यातील उसकई व मयडेनंतर आता खोर्जुवेच्या शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.कारण मानशी धरणाचे दरवाजे खराब झाले आहेत. ज्यामुळे खारे पाणी शेतात आणि विहिरींमध्ये शिरले आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
याविषयी हळदोणेचे आमदार अॅड.कार्लुस फेरेरा म्हणाले की,समस्या सोडवण्यासाठी मामलेदारांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी नोंद करणे आणि निष्क्रिय झालेल्या टेनंट संघटनांना पूर्ववत कार्यान्वित करणे आवश्यक आहे.खोर्जुवेमधील मानशीचा दरवाजा खराब झाला आहे.परिणामी, स्थानिक शेतकरी शेती करू शकत नाहीत.स्थानिकांनी सांगितले की,दरवाजे तुटलेले आणि वाहून गेले आहेत.खरीप आणि रब्बी पिके घेणारे शेतकरी आता शेतात खारे पाणी शिरल्याने चिंतेत आहेत. मानशीच्या दरवाजाची देखभाल करण्यास कोणतीही समिती सक्रिय नाही,त्यामुळे नवीन समिती स्थापन करण्याची आवश्यकता आहे.यासंदर्भात शेतकऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांची चौकशी केली आहे.
शेतकरी दीपाली पाळणी म्हणाल्या की, या वर्षी आम्ही हळसांदे पिकाची लागवड केली होती, पण खारे पाणी शिरल्याने ते खराब झाले. गेल्या दोन वर्षांपासून तुटलेल्या दरवाज्यामुळे आमचे नुकसान होत आहे. तसेच विहिरींवरील पाण्यावर परिणाम झाला आहे. काही काळापूर्वी आमदारांनी दुरुस्त केलेल्या दरवाजाशिवाय इतर सर्व दरवाजे तुटलेले असल्याने, मामलेदारांनी मानशीच्या दरवाजाच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावर लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे.