मुंबई- शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसहीत राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटातून बाहेर पडले आहेत. आता वांद्रे पश्चिमेतील उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मशाल हे नवे निवडणूक चिन्ह घेऊन सर्वप्रथम जानावळेच मातोश्रीवर दाखल झाले होते.
जानावळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे आपल्या राजीनाम्याची कारणे कळवली आहेत. गेली सहा वर्षे मला माझ्या कार्यक्षेत्राबाहेर नियुक्त करून माझी राजकीय कोंडी करण्याचे कारस्थान विभाग प्रमुख अनिल परब करत आहेत. मागील पालिका निवडणूक मी नोकरी, घर-दार सोडून भाजपाच्या विरोधात सर्व शक्तीनिशी लढलो. मात्र थोड्याशा फरकाने माझा पराभव झाला. तरीही मी खचलो नाही. माझे संघटनात्मक जनसेवेचे, रुग्णसेवेचे काम सुरूच होते. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील माझ्या प्रभाग क्रमांक 71 मध्ये एकदा तरी भगवा फडकवायचा अशी माझी इच्छा होती. परंतु दुर्दैवाने अनिल परब यांनी सहा वर्षे मतदारसंघाबाहेर ठेवले. विभागात काम करू देण्याची विनंती मी वारंवार परब यांच्याकडे केली. मात्र त्यांनी टाळाटाळच केली. ही बाब मी आपल्या आणि आदित्य ठाकरे यांच्या कानावर घातली होती. मात्र अद्याप आपल्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने मी उप विभागप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे जानावळे यांनी पत्रात
म्हटले आहे.
मातोश्रीवर पहिली मशाल नेणाऱ्याचाही ‘जय महाराष्ट्र’
