म्हापसा – गोव्यातील कदंब महामंडळातर्फे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ‘माझी बस’ योजना बंद करावी, तसेच कदंब कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची प्रलंबित थकबाकी आणि इतर मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी कदंबा चालक आणि संलग्नीत कर्मचारी संघटना तसेच आयटकने केली.
कदंबा चालक आणि संलग्नीत कर्मचारी संघटनेने आयटकच्या सहकार्याने पर्वरी येथील कदंब महामंडळाच्या कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आयटक गोवाचे समन्वयक ख्रिस्तोफर फोन्सेका, आत्माराम गावस, कदंब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर व पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले की, गेल्यावेळी कदंबा कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने सात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्यामुळे आम्ही संप मागे घेतला होता. मात्र अद्याप या मागण्या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन आयोजित केले होते. तरीही मागण्या पुर्णत्वास न आल्यास आम्हाला संपाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.