प्रयागराज -उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भाविकांच्या बोलेरोची आणि बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये दहा भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला तर १९ जण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यातील भाविक बोलेरो गाडीने संगमावर स्नान करण्यासाठी प्रयागराज महाकुंभ येथे निघाले होते. रात्री २ वाजण्याच्या सुमारास बोलोरे प्रयागराज-मिर्जापुर महामार्गावरील पुरा गावाजवळ पोहोचली. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बस बरोबर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो चक्काचूर झाली. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरु केले. या दुर्घटनेत बोलेरोतील १० जणांचा मृत्यू झाला आणि बसमधील १९ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रामनगरच्या सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले आहे. बसमधील भाविक मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महाकुंभवरुन ते वाराणसीला जात होते.