लखनऊ- येत्या १३ जानेवारीपासून हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक असलेला महाकुंभमेळा हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनारी सुरू होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी सुमारे ४० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या कुंभमेळ्यात येणार्या प्रसिद्ध साधूंच्या राहण्याची शाही व्यवस्था करण्यात आली आहे. यातील एका तंबूची किंमत तर १ लाखांच्या घरात आहे. असे ४० तंबू नदीच्या किनारी उभारले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे खुद्द महाकुंभच्या तयारीचा आढावा घेत आहेत. या पवित्र धार्मिक सोहळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या तिजोरीत जवळपास २ लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. यंदाचा महाकुंभ भव्यदिव्य आणि डिजिटल असेल. भाविकांच्या सुविधांसाठी पर्यटन नकाशा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने सुरक्षा यंत्रणा व स्मार्टफोनच्या सहाय्याने प्रसाधनगृहाची स्वच्छता पाहण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी राहण्याची शाही व्यवस्थाही आहे. ‘टीयूटीसी’ मध्ये राहण्याची सोय नदीच्या किनारी केली आहे. यात ४४ तंबू आहेत. त्यात दोन जणांची राहण्याची व्यवस्था आहे. या तंबूचे एका दिवसाचे भाडे १ लाख रुपये आहे. या तंबूत बटलरपासून रूम हिटर, बाथरूम, गिझर आदी सुविधा आहेत. १४, २९ जानेवारी व ३ फेब्रुवारीला या तंबूंना मोठी मागणी आहे. कारण या दिवशी शाहीस्नान होणार आहे. तसेच इतर तंबूचा पर्यायही उपलब्ध आहे.
यातील डिलक्स रूममध्ये एक दिवसाचे भाडे १०,५०० रुपये आहे. यात न्याहारीची व्यवस्था आहे.. प्रिमियम श्रेणीचे दिवसाचे भाडे १५,५२५ रुपये आहे. शाहीस्नानाच्या दिवशी डिलक्स तंबूचे भाडे १६,१०० रुपये आहे, तर शाहीस्नानाच्या दिवशी प्रीमियम श्रेणीतील तंबूचे प्रति दिवस भाडे २१,७३५ रुपये आहे. या महाकुंभमध्ये उद्योगपती गौतम अदानी रोज एक लाख भाविकांना प्रसादाचे वाटप करणार आहेत. यासाठी त्यांनी इस्कॉनसोबत हातमिळवणी केली आहे.