नवी दिल्ली – महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मला माझ्या पत्नीकडे पाहणे आवडते, असे विधान करून एल अँड टी कंपनीचे सीईओ एस. एन. सुब्रह्मण्यम यांना टोला लगावला. सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी टिप्पणी केली होती की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे. रविवारीही सुट्टी घेऊ नये. तुम्ही तुमच्या बायकोला किती वेळ पाहत राहणार? त्यापेक्षा काम करा. या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला होता. सुब्रह्मण्यम यांच्यापूर्वी गेल्या वर्षी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनीही युवकांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे असे म्हटले केले होते. त्याचीही मोठी चर्चा झाली होती.
आनंद महिंद्रा म्हणाले की, कामाच्या प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर अधिक लक्ष दिले पाहिजे. तुम्ही ४० तास, ७० तास किंवा ९० तास काम करा. तुम्ही जर १० तासांत जग बदलू शकत असाल तर ते महत्वाचे आहे. कामाची गुणवत्ता सर्वात महत्त्वाची आहे. कंपनीत हुशारीने निर्णय घेणारी माणसे पाहिजेत. समग्र विचार करणारी बुद्धिमत्ता असावी.
ते पुढे म्हणाले की, अभियंते आणि एमबीए पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे ते चांगले निर्णय घेऊ शकतील. विचार करायला वेळ नसेल, तर निर्णय घेताना योग्य सूचना कशा देणार?