मुंबई – पंतप्रधानांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठ्या अभिमानाने मराठीला अभिजात दर्जा देत असल्याचे समाजमाध्यमावर सांगितले. त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आम्हीच कसे मराठीचे तारक, संरक्षक, मराठी प्रेमी आहोत असे ढोल पिटले. असे असले तरी अद्याप मराठीला अभिजात दर्जा दिल्याचा अध्यादेशच काढण्यात आला नाही असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मराठी बरोबर इतर ज्या भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला त्यापैकी काहींचे अध्यादेश निघाले मात्र मराठीचा काढण्यात आला नाही. त्यामुळे हा भाजपाचा केवळ चुनावी जुमला होता का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी देशात व्यंगचित्रकारांना नोटीसा पाठवण्यात आल्याचा त्यांनी निषेध केला. ते म्हणाले की, हे सारे हिटलरच्या काळात होत होते. डेव्हिड लो हा हिटलर विरोधात व्यंगचित्र काढत असे. त्याला जिंवत किंवा मृत पकडावे असे आदेश हिटलरने दिले होते. तसेच आपल्या देशातही सुरु आहे. ते आपल्या विरोधात असलेल्यांना तुरुंगात टाकतात किंवा त्यांचे आवाज बंद करतात. भाजपा शासित राज्यांमध्ये भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या पत्रकारांची हत्या होते. छत्तीसगडमधील मुकेश चंद्रकारा व महाराष्ट्रातील संतोष देशमुख या दोघांच्या हत्या सारख्याच आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपाचे राज्य आहे. याला हे लोकशाही म्हणतात. पंतप्रधान केवळ जिथे निवडणूका असतात तिथे जातात. अनेक घोषणा करतात मात्र दिल्लीची जनता सुज्ञ असून ती अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर आहे. भाजपा गोमांस निर्यात करणाऱ्यांचा पैसा वापरतात व आम्हाला हिंदूत्व शिकवतात. उत्तर प्रदेशात तर भाजपाच्याच आमदाराने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येते. पंतप्रधान हे स्वतः डबलस्टॅंडर्ड आहेत.