मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक्स सोशल मीडियावर विस्तृत पोस्ट शेअर करून मनसेचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश दिला की राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत मनसेच्या प्रत्येक शाखेत महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करा.
राज ठाकरे यांनी आपल्या या प्रदीर्घ पोस्टमध्ये मागील पंचवीस वर्षांचा आढावा घेतला.मागील पंचवीस वर्षांत झालेले बदल, मनसेची स्थापना आणि आजवरचा प्रवास, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला आलेले अपय़श, मराठी माणसांवर होत असलेला अन्याय आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेली चिंताजनक वाढ आदि मुद्यांवर राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केले.
ते म्हणाले की, सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, कालगणनेत या वर्षाला महत्व आहे, कारण चालू शतकातील पाव शतक संपत आले आहे. माणसाच्या आयुष्यातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात एवढे प्रचंड बदल झाले आहेत की 25 वर्षांपूर्वीचे आयुष्य हे एक वेगळे युग होते का असे वाटू लागले आहे. या 25 वर्षांच्या कालावधीत आपण महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली. पक्ष स्थिरावला. पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. हे सगळे आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेले.
या 25 वर्षांत जरी खूप बदल झाले असले तरी अनेक गोष्टी मात्र होत्या तशाच राहिल्या आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या महानगरात मराठी माणसालाच असुरक्षित वाटणे, तरुण मुलामुलींच्या हाताला काम नसणे, मात्र त्याचवेळी बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांना नोकरीच्या संधी मिळणे, जातीजातींमध्ये भांडणे लावणे, शेतकऱ्यांपासून ते सर्वच कष्टकऱ्यांचे आयुष्य महागाईने होरपळून निघणे या आणि इतर समस्या होत्या तशाच आजही आहेत, प्रत्येक समस्येच्या वेळी लोकांना मनसेची आठवण होते. मात्र मतदानाच्या वेळी नेमका विसर पडतो.
पक्षाच्या भावी वाटचालीबद्दल राज ठाकरे पुढे लिहितात, वास्तव स्वीकारून आता काही बदलांसह आपल्याला पुढे जावे लागेल.23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो,पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळले.नक्की काय घडले यावर माझे मंथन सुरू आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना माझे आवाहन आहे की जे घडले ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवडयातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली. त्यावेळी मनसेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि आपण तसे केले सुद्धा. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जात आहे हे वास्तव अधोरेखित झाले.महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत.राज्यातील दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक आहेत, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. दुसरीकडे लोक महागाईने होरपळून
निघत आहेत.