पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक नाही
मुंबई- रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती, सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०:४० ते ३:४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून डाऊन जलद/सेमी-जलद लोकल गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा धावणार आहेत. कल्याण येथून सकाळी १०:२८ ते ३:४० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. याही गाड्यांना दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबावे लागेल. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा उशिरा धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवल्या जातील. त्याचप्रमाणे, सीएसएमटी / दादर येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ठाणे/विक्रोळी सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील. पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११:०५ ते ४:०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे ब्लॉक कालावधीत सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सीएसएमटी मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.