मुंबई – भारतीय क्रिकेट संघावर आज मायदेशातच अत्यंत लाजिरवाणा पराभव पत्करण्याची वेळ आली. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे सुरू असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 25 धावांनी पराभव करत न्यूझीलंड संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. भारताला चौथ्या धावांत केवळ 147 धावांचे किरकोळ आव्हानही पेलवले नाही. 24 वर्षांनंतर प्रथमच टीम इंडियावर मायदेशात सपशेल पराभूत होण्याची वेळ आली. या पराभवामुळे भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची वाट बिकट झाली आहे. भारतीय स्टार फलंदाजांचे दारूण अपयश हे या मालिकेचे ठळक वैशिष्ट्य ठरले.
या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यावर तिसरी कसोटी जिंकण्याची सोपी संधी भारताला चालून आली होती. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे चौथ्या डावात भारताला केवळ 147 धावा करायच्या होत्या. ही माफक धावसंख्या भारताचे फलंदाज सहज पार करून मालिकेत गमावलेली आपली पत काही प्रमाणात राखतील, असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते. परंतु भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. भारतीय संघाचा डाव फक्त 121 डावांवर आटोपला. यात ऋषभ पंतने सर्वाधिक 64 धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने दुसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक 12 धावा केल्या. फक्त 3 भारतीय फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. 8 फलंदाजांनी 10 पेक्षा कमी धावा केल्या. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक 6 बळी घेतले.
या मालिकेतून टॉम लॅथम प्रथमच न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत होता. शिवाय न्यूझीलंडने ही कसोटी मालिका केन विल्यमसनसारख्या भरवशाच्या फलंदाजाशिवाय खेळली. मात्र, अनपेक्षित कामगिरी करून न्यूझीलंडने भारताला चारी मुंड्या चीत केले. भारतीय फलंदाजांना त्यांच्याच फिरकीच्या जाळ्यात अडकवून मालिकेतील एकाही सामन्यात डोके वर काढू दिले नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल या सगळ्याच फलंदाजांनी निराशा केली. विशेष म्हणजे, भारतीय संघ या मालिकेपूर्वी मायदेशातील सलग 18 मालिकांत अपराजित राहिला होता. परंतु न्यूझीलंडने व्हाईटवॉश देत मालिका जिंकून इतिहास रचला.
भारतीय संघाला 2000 साली दक्षिण आफ्रिकेने मालिका 2-0 ने जिंकून क्लीन स्वीप केला होता. त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत ही नामुष्की ओढावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची वाट अवघड झाली आहे. भारताला आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यात पाचपैकी चार कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत.