नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या सर्वच मतदानानंतरच्या चाचण्यात राज्यात भाजपाची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या याचा निकाल लागणार आहे. मात्र भाजपा सत्तेवर येणार असा सर्वांचा अंदाज आला असतानाही आपचे आमदार फोडण्यासाठी भाजपाने 16 आमदारांना फोन करून 15 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले. या आमदारांनी आणखी आमदार सोबत आणले तर त्यांना मंत्रिपदाचीही ऑफर देण्यात येत आहे अशी जाहीर तक्रार आज आपचे नेते विनय मिश्रा यांनी केली आणि ज्या फोनवरून हे कॉल आले तो फोन नंबरही ट्विटमध्ये जाहीर केला. यामुळे खळबळ माजताच केंद्राने नियुक्त केलेले दिल्लीचे उपराज्यपाल यांनी लाचलुचपत विरोधी विभागा (एसीबी) ला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या विभागाची पथके आश्चर्यकारक वेगाने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह संजय सिंह आणि मुकेश अहलावत या आप नेत्यांच्या निवासस्थानी पोहोचली. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे कुठलीही नोटीस वा कागदपत्रे नव्हती. त्यामुळे केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. अखेर एसीबी पथक दीड तास गेटबाहेर थांबून कारवाई न करताच निघून गेले. यामुळे निकालाच्या आदल्या दिवशी वातावरण ढवळून निघाले आहे.
विविध वाहिन्यांनी भाजपाला पूर्ण बहुमत दाखविल्यावरही भाजपाने कोणतीही कागदपत्रे नसताना घाईने एसीबीची पथके का पाठवली? हा प्रश्न आहे. आपकडे असलेला पुरावा ताब्यात घेण्यासाठी ही धावपळ होती. केजरीवाल यांच्या घरी सर्व 70 उमेदवार होते त्यापैकी काहींना तिथूनच ताब्यात घेऊन फोडण्याची तयारी केली होती. भाजपा जिंकणार हा चाचण्यांनी वर्तवलेला अंदाज मॅनेज केलेला होता. प्रत्यक्षात भाजपा अडचणीत आहे. त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच आपचे आमदार ताब्यात घेण्यासाठी एसीबी अधिकारी पाठवण्याचे चक्रव्यूह रचले होते असे अनेक तर्कवितर्क आजच्या एसीबीच्या आततायी कारवाई नंतर लावले जात होते.
आज सकाळी अकरा वाजता आमदार खरेदीच्या मुद्यावरून केजरीवाल यांनी आपल्या सर्व 70 उमेदवारांची बैठक निवासस्थानी बोलावली होती. दुसरीकडे केजरीवाल यांच्या आरोपांनंतर भाजपा नेते वीरेंद्र सचदेव यांनी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहून आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. उपराज्यपालांनी लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर तातडीने एसीबीने तीन पथके तयार केली. यातील एकेक पथक अरविंद केजरीवाल, खा. संजय सिंह आणि आमदार मुकेश अहलावत यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले. अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलेल्या पथकाने सांगितले की, आम्ही जबाब नोंदवून घ्यायला आलो आहोत. परंतु या पथकाकडे कुठलीही लेखी नोटीस किंवा कागदपत्रे नसल्याने या पथकाला निवासस्थानात प्रवेश नाकारण्यात आला. हे पथक प्रवेशद्वारापाशीच दीड तास थांबून राहिले. यावेळी आपच्या वकिलांची टीमही तिथे उपस्थित झाली. त्यांनी पथकाला नोटीस दाखवा, असे सांगितले. परंतु या पथकाकडे लिफाफ्यात फक्त कोरा कागद होता. त्यावर कुठलाही सही-शिक्का नव्हता. नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला जबाब घेता येणार नाही, असे सांगितल्यावर या पथकातील अधिकाऱ्यांनी फोनवरून कुणाकडून तरी सूचना घ्यायला सुरुवात केली. हा प्रकार दीड तास सुरू राहिला. त्यानंतर हे पथक निघून गेले आणि लिखित कायदेशीर नोटीस घेऊन पुन्हा आले. केजरीवाल यांना ही नोटीस देऊन पथक रिकाम्या हाताने तिथून निघून गेले. केजरीवाल पान 1 वरून – यांच्या घरी हे नाट्य घडत असतानाच आपचे खा. संजय सिंह हे स्वतःच एसीबीच्या कार्यालयात गेले. त्यांनी तिथे या प्रकरणाची रितसर लेखी तक्रार नोंदवली. तिथून बाहेर आल्यावर ते म्हणाले की, कारवाईचा वेग आश्चर्यकारक आहे. दिल्लीतील हत्या, लुटमार, बलात्कार, कोर्टात हत्या, दरोडे यांच्या बाबतीत आदरणीय उपराज्यपाल यांच्याकडून इतक्या वेगाने कारवाई केली जाते का? भाजपाच्या सांगण्यावरून उपराज्यपालांनी ही पथके आमच्या घरी पाठवली. तक्रार नोंदवून घ्यायला ही पथके अशी कुणाच्याही घरी जातात, ही कायदेशीर घुसखोरीच आहे. यांच्या हायकमांडने यांना सांगितले म्हणून त्यांनी ही कारवाई केली. भाजपा हा आता आमदारांना विकत घेणारा, पक्ष फोडणारा, ऑपरेशन लोटस करणारा, सरकारे पाडणारा बेईमान पक्ष झाला आहे. आता या प्रकरणाची मी स्वतःच तक्रार केली आहे. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. आमच्या आमदारांना फोन आले आहेत. तपासात आम्ही हे सर्व पुरावे देऊ. आपचे वकील संजीव नासियार म्हणाले की, भाजपा निवडणूक हरणार असल्यानेच त्यांनी हे कारस्थान केले आहे. यातून भाजपाचे राजकीय नाट्य उघड झाले आहे. देशात पहिल्यांदाच असा प्रकार झाला असेल की, तक्रार घ्यायला पोलीस स्वतः दारात आले. केजरीवाल यांच्या घरी आलेल्या अधिकाऱ्यांकडे कुठलीही कागद किंवा नोटीस नव्हती. तुम्हाला कुणी पाठवले आहे, आधी नोटीस द्या, नोटीस न आणताच कसे आलात, असे विचारले असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते. ते फोनवरून कुणाच्या तरी सूचना घेत होते. ते कुठलीही तयारी करून आले नव्हते. कुणाचीच तक्रार नसताना ते केवळ भाजपाच्या दबावाखाली इथे आले. पण हा देश कायद्याने चालतो. भाजपात जाण्याची ऑफर मिळालेले दिल्ली आप सरकारमधील मंत्री आणि सुलतानपूर मजरा येथील आपचे उमेदवार मुकेश अहलावत म्हणाले की, मलाही एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने सांगितले की, त्यांचे सरकार स्थापन होत आहे. जर मी आप सोडून त्यांच्या पक्षात सामील झालो तर ते मला 15 कोटी देतील आणि मंत्री बनवतील. पण मी शेवटपर्यंत आम आदमी पार्टी सोडणार नाही. या नाट्यानंतर उद्या निकाल काय लागतो याची उत्सुकता वाढली आहे.
भाजपा आमदारांना 15 कोटी देऊन फोडते! आरोप होताच केजरीवालना अटक करायला धावपळ
